प्रयोग मालाड संस्थेतर्फे राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धा, एकांकिका अभिवाचन स्पर्धा आणि मूकनाटय़ स्पर्धाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही नुकताच अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रदीप कब्रे यांच्या हस्ते मुंबईत पार पडला.
एकांकिका लेखन स्पर्धेत ३५ जण सहभागी झाले होते. तर एकांकिका अभिवाचन आणि मूकनाटय़ स्पर्धेत ३१ संस्थांचे १००हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. एकांकिका लेखन स्पर्धेसाठी विजय मोंडकर व रामकृष्ण गाडगीळ यांनी परीक्षक म्हणून तर एकांकिका अभिवाचन व मूकनाटय़ स्पर्धेसाठी भालचंद्र झा व राजेंद्र पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
एकांकिका लेखन स्पर्धेत ५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र इरफान मुजावर यांना ‘आधे अधुरे’ या एकांकिकेसाठी देण्यात आले. तर द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे संचित वर्तक लिखित ‘खा.के.पी.के’ आणि मयूर निमकर लिखित ‘बोन्साय’ या एकांकिकेला मिळाले. एकांकिका अभिवाचनात ५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ओम साई संस्थेला मिळाले. द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे मैत्री कला मंच व मैत्री एन्टरटेंटमेंट यांना मिळाले.
मूकनाटय़ स्पर्धेत ५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक श्री गजानन कला मंच (तुझे आहे तुजपाशी) यांना तर द्वितीय पारितोषिक अनुक्रमे वेध अकादमी (भागम् भाग) यांना मिळाले. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक अजित जाधव (तुझे आहे तुजपाशी) यांना तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक नीलय घैसास (भागम् भाग) यांना मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा