मुंबई : बस किंवा रेल्वेमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणारे, गाणी ऐकणारे किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहणारे, यांचा अन्य प्रवाशांना नेहमीच जाच होतो. आता किमान ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची यातून सुटका होणार आहे. ‘बेस्ट’ने मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलण्यास, गाणी ऐकण्यास मनाई केली आहे. तसेच याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आदेश ‘बेस्ट’ प्रशासनाने दिले आहेत.
‘बेस्ट’ उपक्रमाच्या बसमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. काही प्रवासी मोबाइलवरून अन्य व्यक्तीशी मोठय़ा आवाजात संभाषण करीत असतात. काहीजण मोठय़ा आवाजात गाणी ऐकतात. याचा सहप्रवासी तसेच वाहक आणि चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. वाहकाने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे याबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्या. त्यांची दखल घेऊन मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणाऱ्या वा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना अद्दल घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार मोबाइलचा लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांना समज देण्याची सूचना चालक, वाहक आणि तिकीट तपासनीसांना करण्यात आली आहे. संबंधित प्रवासी वाद घालत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. सहप्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी बोलताना, गाणी ऐकताना इयर-फोनचा वापर करण्याचे आवाहन ‘बेस्ट’ने केले.
बसमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलण्याचा, मोठय़ा आवाजातील गाण्यांचा सहप्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी ‘बेस्ट’ने संबंधितावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. प्रथम त्याला समज द्या आणि त्यानंतरही त्रास सुरूच राहिल्यास पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – मनोहर गोसावी, उप जनसंपर्क अधिकारी, ‘बेस्ट’ उपक्रम