शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’बाबत ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया देणाऱ्या दोन तरुणींच्या अटकेवरून सध्या चांगलाच वादंग सुरू आहे. प्रसिद्ध वकील आभा सिंग यांनीही या दोन तरुणींवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे मूलभूत हक्कांची पायमल्ली असल्याचा आरोप करीत त्याविरोधात मंगळवारी राज्य आयोगाकडे तक्रार केली.
शाहीन धाडा आणि रेणू श्रीनिवास या दोन मैत्रिणींना पालघर पोलिसांनी ‘फेसबुक’वरील प्रतिक्रियेप्रकरणी अटक केली होती. तक्रारीत सिंग यांनी आयोगाला संबंधित पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील ‘केस डायरी’ पाहण्याची आणि एकूण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्या प्रकारे या मुलींना अटक करण्यात आली. त्यावरुन मानवी हक्कांचे आणि महिलांना अटक करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. सर्वसाधारणपणे दरोडा, खून, चोरी, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी फरारी असेल वा कायदेशीर प्रक्रियेपासून पळत असेल वा हिंसक वृत्तीचा असेल वा सराईत गुन्हेगार असेल, तर त्याला अटक केली जाते. परंतु या प्रकरणात अशी कुठलीही परिस्थिती नसताना पोलिसांनी दोघींवर अटकेची कारवाई केली, असे सिंग यांनी म्हटले आहे. या प्रकरणी शाहीन व रेणूने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. उलट स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केल्याचे दिसत असल्याचा आरोपही सिंग यांनी केला आहे. शाहीन आणि रेणू यांना अटक झाल्याचे न दाखविताच त्यांना सूर्योदयापूर्वी पालघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४६(४) नुसार महिलांना सूर्योदयानंतर अटक करणे अनिवार्य आहे, त्यापूर्वी नाही. असे असतानाही त्यांना अटक करताना पोलिसांनी हे नियम धाब्यावर बसविले. या दोघींवर अटकेची कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही सिंग यांनी केली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी ती चौकशी नि:पक्षपातीपणे होणार नाही म्हणून आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. तसेच महिला आयोगाने तक्रारीची दखल घेतली नाही, तर आपण न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावू, असेही सिंग यांनी नमूद केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा