अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका २२ वर्षीय महिलेने दीपक निकाळजे विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला उपनगरात चेंबूर सिद्धार्थ कॉलनी येथे राहायला आहे. दीपक निकाळजेने लग्नाचे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केले असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आम्ही टिळक नगर पोलीस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल केला आहे अशी माहिती झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली. दीपक निकाळजेवर कलम ३७६ ( बलात्कार), ३५४ (लैंगिक शोषण) आणि कलम (३१३) लावले आहे.
झीरो एफआयआर अंतर्गत तुम्ही कुठल्याही पोलीस स्थानतकात तक्रार दाखल करु शकता त्यानंतर ज्या हद्दीत गुन्हा घडला आहे तिथे केस ट्रान्सफर होते. पनवेलमध्ये हा गुन्हा घडला असून तिथे केस ट्रान्सफर होईल. पनवेल पोलीस पुढील तपास करतील असे शहाजी उमप यांनी सांगितले.
पीडित तरुणीला शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी होती. त्यासाठी तिने दीपक निकाळजेची पहिल्यांदा भेट घेतली होती. तिथून पुढे दोघांमध्ये संपर्क वाढत गेला असे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला आर्थिक मदत केल्यानंतर निकाळजेने लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे शोषण सुरु केले असे पोलिसांनी सांगितले.