* ध्वनी प्रदूषणाप्रकरणी उच्च न्यायालयाची उद्विग्नता

* बिनशर्त माफीनाम्यानंतरही श्रीकांत शिंदे यांच्याकडून नियमभंग

मुंबई : ध्वनी प्रदूषणाचे नियमांचे यापुढे काटेकोर पालन केले जाईल अशी हमी देतानाच नियमभंग केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागणाऱ्या शिवेसनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा नियम धाब्यावर बसवल्याची तक्रार बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधीच कायदे पायदळी तुडवू लागले तर कसे होईल, असा उद्विग्न सवाल केला.

‘हिराली फाऊंडेशन’तर्फे बुधवारच्या सुनावणीत शिंदे यांनी बिनशर्त माफी मागूनही कशाप्रकारे पुन्हा नियमभंग केला हे न्यायालयाला सांगण्यात आले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अंबरनाथ येथील शिवमंदिरात आयोजित महोत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी शिंदे यांनी बिनशर्त माफी मागितली होती. तसेच याचा पुनरावृत्ती होणार नाही, अशी हमीही दिली होती. त्यानंतरही ऑक्टोबर महिन्यात डोंबिवली येथे आयोजित दांडियामध्ये त्यांनी पुन्हा नियमांचे उल्लंघन केले, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्या. अभय ओक आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली. तसेच या सगळ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे. तर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. शिवाय त्याचे परिणामही स्पष्ट केले आहेत. असे असताना त्याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याऐवजी लोकप्रतिनिधी स्वत:च नियम धाब्यावर बसवत असल्याचे न्यायालयाने सुनावले.