‘दबंग-२’मधील ‘आयटम साँग’ वादात अडकण्याची शक्यता आहे. ‘लौंडिया पटाऊंगा मिस्ड कॉलसे..’ असे बोल असलेल्या या गाण्यामुळे महिलांची आणि मुलींची प्रतिमा डागाळली जात असल्याचा ठपका ठेवत उत्तर प्रदेशातील इटावा शहराच्या तहसीलदारांनी या गाण्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेल्या या याचिकेत संबंधित ओळ गाण्यातून काढून टाकावी किंवा गाणेच चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयी अरबाज खानने १७ जानेवारी रोजी आयोगासमोर हजर राहावे, अशी नोटीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी बजावली आहे.‘दबंग-२’मधील हे गाणे सलमान खान व करिना कपूरवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील संबंधित ओळींमुळे महिलांची प्रतिमा मलीन होते. तसेच महिलांवरील अत्याचार आणि त्यांची असुरक्षितता वाढण्याचा धोका आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. ‘लौंडिया पटाऊंगा मिस्ड कॉलसे..’ ही ओळ महिलांचा अपमान करणारी आहे. तसेच या ओळीमुळे तरुणांमध्ये महिलांबद्दल वाईट संकेत जातो, असेही याचिकाकर्ता व इटावाचे तहसीलदार विक्रमसिंह यादव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.