मुंबईः गायक यो यो हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण करून डांबून ठेवल्याची तक्रार इव्हेंट एजन्सीच्या मालकाने बीकेसी पोलिसांकडे केली. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून पुढील तपास सुरू आहे.
‘फेस्टिविना म्युझिक फेस्टिव्हल’चे मालक विवेक रवी रमण यांनी अलिकडेच वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर ‘यो यो हनी सिंग ३.०’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या दिवशी, रामन यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पैसे न देण्यावरून त्यांचा तेथील विक्रेत्यांसोबत वाद झाला. कार्यक्रमाची तिकीट विक्रीची आणि भागिदाराकडून येणारी रक्कम वेळेत न आल्यामुळे रमण यांनी कार्यक्रम रद्द केला आणि सर्व कलाकारांच्या व्यवस्थापन संघांना कळवले. गायक सिंग आणि त्याचे कर्मचारी कार्यक्रम रद्द केल्यामुळे संतप्त झाले आणि त्यांनी रमणवर हल्ला केला.
हेही वाचा >>>“…अन्यथा सभेत घुसणार”, गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रतिआव्हान; म्हणाले, “घुसा आणि…”
“यो यो हनी सिंह आणि त्याचे कर्मचारी रोहित छाबरा, अक्षत जैस्वाल, राहुल जैस्वाल, इंद्रजित सुनील, निखिल, अरविंदर क्लेर, अरुण कुमार आणि अक्षय मेहरा यांनी माझ्यावर हल्ला केला, अपहरण केले आणि धमकावले. पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गोटारगाडीत जबरदस्ती बसवून नेले, अशी तक्रार रमण यांनी केली आहे.
आम्हाला नुकतीच तक्रार प्राप्त झाली आहे आणि त्यात केलेल्या आरोपांची पडताळणी करण्यात येत आहे. अद्याप कोणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही,” असे बीकेसी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.