लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेचे नवनिर्वाचित महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी बुधवारी दुपारी अचानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाची पाहणी केली. यावेळी एक प्रवासी पुढे आला आणि त्याने अनेक महिन्यांपासून पाणी येत नसल्याची शौचालय अस्वच्छ असल्याची तक्रार केली. अनेक रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारानंतर रेल्वे अधिकारी निरुत्तर झाले. दरम्यान, याप्रकरणी त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यादव यांनी प्रवाशाला दिले. त्यानंतर यादव यांनी या शौचालयात पाहणी करून स्वच्छता राखण्याबाबत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आणखी वाचा-मुंबई : ऑनलाइन गांजा विक्रेता अटकेत
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. सीएसएमटीवरून दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सीएसएमटीच्या फलाट क्रमांक ६ – ७ समोरील शौचालयाचा हजारो प्रवासी वापर करतात. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून शौचालयात पाण्याची कमतरता असल्याने अस्वच्छता वाढली आहे. वर्दळीच्या या स्थानकात दुर्गंधी वाढली असून प्रवाशांना नाकाला रुमाल लावून शौचालयात जावे लागते.