काम अंतिम टप्प्यात आलेले असताना लोअर परळ पुलावरील दक्षिण वाहिनी अवैधरित्या वाहतुकीसाठी खुली केल्याप्रकरणी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर आणि १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरोधात मुंबई महापालिकेने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार ना. म. जोशी. पोलीस ठाण्याने शनिवारी पहाटे आदित्य ठाकरेंसह सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे लोअर परेल आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला होता. या पुलावरील दक्षिण वाहिनीचे काम पूर्ण होत आले असून पथदिवे, मार्गिका आखणी, रंगकाम आदी कामेही लवकरच पूर्ण करून हा पूल तीन-चार दिवसांत वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा मानस होता. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी पुलावरील दक्षिण वाहिनीवरील रस्तारोधक हटवून, नारळ फोडून ती वाहतुकीसाठी खुली झाल्याचे जाहीर करण्यात आले. या वाहिनीची स्थिरता चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या वाहिनीवरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने महापालिकेचे दुय्यम अभियंता पुरुषोत्तम इंगळे यांनी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर यांच्यासह १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली.इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शनिवारी पहाटे ३.२२ च्या सुमारास आदित्य ठाकरेंसह सर्वाविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>>‘लोकसत्ता लोकांकिका’चे पडघम! प्राथमिक फेरीसाठी जोरदार तयारी सुरू

‘समृद्धी महामार्गावरील शेकडो बळीप्रकरणी गुन्हा का दाखल नाही?’

’ डिलाईल पुलावरून प्रवास केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल केला जाणार असेल तर समृद्धी महामार्गाचे उदघाटन केल्यानंतर अपघात होऊन शेकडो प्रवाशांचे बळी गेल्याबद्दल मुख्यमंत्री अथवा रस्ते विकास महामंडळावर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला. 

’ मुंबईकरांच्या हक्कासाठी लढताना गुन्हे दाखल होणार असतील तर त्याचा मला अभिमान आहे. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनाही माझ्या या कृतीचा अभिमान वाटला असता, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात मुंबई पालिकेने  दाखल केलेल्या गुन्हाच्या संदर्भात व्यक्त केली.

’ हे सरकार विकासक आणि ठेकदारांचे आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’ बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत तर ‘सत्तामेव जयते’ बोलणाऱ्यांना या राज्यात अभय दिले जात आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

’ हे सरकार ३१ डिसेंबरला जनतेचा निरोप घेणार आहे. त्यापूर्वी पूर्ण झालेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प जनतेसाठी खुले करण्याची समज मुख्यमंत्र्यांना द्यावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

’ जनतेच्या कामांसाठी गुन्हे दाखल केले जाणार असतील तर त्याचा मला अभिमान आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालकडून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव होता. शिवडी न्हावा-शेवा सागरी मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पाच टक्के काम शिल्लक ठेवून या पुलाचे लोकार्पण जाणूनबुजून लांबणीवर टाकण्यात आले आहे. असा आरोप ठाकरे यांनी केला. 

’ आमदार अपात्र प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादाकडे आहे. नार्वेकर यांनी संविधान व कायद्याप्रमाणे निर्णय घेतल्यास ४० आमदार अपात्र ठरणार याची खात्री असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of municipal administration regarding opening of south channel on lower paral bridge for traffi amy