एमएमआरडीएने पैसे दिले तरच त्यांच्या हद्दीमधील मिठी नदीतील गाळ साफ करू अन्यथा या कामाला हात लावणार नाही, अशी ताठर भूमिका सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने घेतल्यामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले आहे. त्यामुळे आता मिठीच्या सफाईसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच गाऱ्हाणे घालण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
वेळीच गाळ काढला नाही तर मिठी नदीलगतचा भाग पावसाळ्यात जलमय होण्याची भीती आहे. परिणामी त्याचा थेट फटका सर्वच मुंबईकरांना बसेल. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार भूमिका घेतली आहेत. त्यामुळे या संदर्भात आता शासन दरबारी दाद मागण्यात येईल. या संदर्भात लवकरच एक अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. कायद्यातील अन्य नियमांचा आधार घेऊन मुंबईकरांच्या हिताचे हे काम कसे करता येईल याचा विचार करण्यात येत आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader