लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’वरील अश्लील दृश्यांप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अश्लील चित्रीकरणासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
तक्रारदार स्वप्नील हिरे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी एमएचबी पोलिसांनी ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’, एकता कपूर व शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अल्ट बालाजी टेलिफिल्म’वरील ‘क्लास ऑफ २०१७’ व ‘क्लास ऑफ २०२०’ या वेब सिरिजबाबत तक्रार करण्यात आली आहे. यावेळी अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मुलीला अश्लील अर्थाचे संवाद देण्यात आले आहे. तसेच कलाकार शालेय गणवेशात अश्लील कृत्य करताना दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांवर परिणाम होऊ शकतो. याप्रकरणी तक्रारीनंतर एमएचबी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम १३ व १५ , माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा ६७ (अ), वुमन प्रोहिबिशन ॲक्ट १९८६ कलम २९२, २९३ व भादंवि कलम २९५ (अ), तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंधक कायदा २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-दाऊदने घडविलेल्या जे.जे. गोळीबाराप्रकरणी प्रमुख आरोपीला अटक
तक्रारीनुसार, फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत अश्लील चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला आहे. यावेळी अल्पवयीन मुलीला अश्लील संवादही देण्यात आले होते. तसेच प्रतिबंध असतानाही सिगारेटचा वापर करण्यात आला. त्याबाबत कोणताही वैधानिक इशारा (डिस्क्लेमर) देण्यात आलेले नाही. तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींचा अपमान होईल, असे व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच बोरिवली न्यायालयातही तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.