मुंबई : परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी ६९ नवीन इंटरसेप्टर वाहनांवर कॅमेरायुक्त रडार यंत्रणेच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी लिहिलेले तक्रार पत्र प्रसारित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खडसे यांच्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, भीमनवार आणि कळसकर यांनी सरकारी खरेदी नियमांना बगल देत मेसर्स अशोका बिल्डकॉन लिमिटेडला ‘व्हेईकल टॉप माउंटेड रडार डिव्हाइसेस’साठी २२.७९ कोटी रुपयांचे कंत्राट दिले. तसेच या कंपनीला या क्षेत्रात पूर्वीचा अनुभव नसतानाही कंत्राट देण्यात आले आहे. तसेच जीईएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) संकेतस्थळाचा वापर करण्याऐवजी, अधिकाऱ्यांनी पारदर्शकता आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून एका विशिष्ट व्यवसाय गटाला पसंती देण्यासाठी ई-निविदा (ई-टेंडरिंग) प्रक्रिया निवडण्यात आली असे आरोप खडसे यांनी लिहिलेल्या पत्रात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एक दिवस ही निविदा देण्यात आली होती. निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये तसेच छाननी टाळण्यासाठी घाईघाईने करार केल्याचा संशय निर्माण झाला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

सर्वसाधारणपणे रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर अचूक कारवाई करणाऱ्या रडार यंत्रणेची खरेदी करताना लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व कंपन्यांना या क्षेत्रातील अनुभव असणे अपेक्षित होते. ज्याप्रमाणे देशातील दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, कर्नाटक व बिहार या राज्यांनी याच उपकरणांची खरेदी जीईएम पोर्टलवर निविदा जारी करुन केलेली आहे. परंतु, फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच खरेदी प्रक्रियेमध्ये सक्षम व योग्य बोली लावणारा, मूळ उपकरण निर्माता (ओईएम) यांना सहभाग घेता येऊ नये, त्याकरिता केवळ ‘एक हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल’ हा एकमेव निकष ठेवून व इतर आवश्यक तांत्रिक निकषांना फाटा देऊन इष्टतम स्पर्धेच्या तत्वाला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भीमणवार व कळसकर यांनी छेद दिलेला आहे, असे तक्रार पत्रात म्हटले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमताने शासकीय तिजोरीतील १५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा आरोप तक्रार पत्रात म्हटले आहे.

आमच्याकडे अधिकृत तक्रार प्राप्त नाही. मात्र, वाहनांवरील मोबाइल आयटीएमएस यंत्रणा यासंबंधीची सर्व माहितीचा अहवाल यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच ज्या तक्रारदाराने तक्रार केली आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. – भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त

प्रकरणाची तक्रार आल्याची समजले आहे. याबाबतचा अहवाल आधीच शासनाकडे पाठवला आहे.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त