समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या स्वार्थनिरपेक्ष कामाची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या कामात समाजाचाही सहभाग वाढावा या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमास या वर्षीदेखील लाखो वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी या संस्थांच्या कामाला आर्थिक हातभार लावून रचनात्मक कामांशी असलेल्या बांधीलकीच्या स्तुत्य मानसिकतेचा प्रत्यय दिला. या वर्षी विज्ञान, संगीत, इतिहास संशोधन, ग्रंथालय, रुग्णसेवा, वृद्धाश्रम आणि उपेक्षितांना स्वावलंबी करण्यासाठी दुर्गम भागात काम करणारे अशा दहा निवडक संस्थांचा परिचय या उपक्रमातून ‘लोकसत्ता’ने वाचकांना करून दिला आणि समाजातील या आधारस्तंभांकडून संस्थांच्या मदतीसाठी ‘लोकसत्ता’कडे धनादेशांचा अक्षरश: महापूर लोटला. सामाजिक बांधीलकीसाठी, सामाजिक कृतज्ञता निधीसाठी परिचित असलेले ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते, निमंत्रितांच्या उपस्थितीत शनिवारी, १० नोव्हेंबर रोजी मुंबईत नरीमन पॉइंट येथील ‘एक्स्प्रेस टॉवर्स’मधील ‘लोकसत्ता’ कार्यालयाच्या सभागृहात या धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे.  हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

Story img Loader