कथेतील पात्रे कागदावर उमटणार; बुकगंगा प्रकाशनाचा उपक्रम, दोन महिन्यांत पुस्तके बाजारात
गोष्ट म्हटलं की लहान मुलं असोत किंवा मोठी माणसे असोत, प्रत्येकाच्या कल्पनाविश्वात एखादी स्वतंत्र आकृती, व्यक्तिरेखा, प्रसंग, पर्यावरण असे एक वेगळे विश्व तयार होत असते. कथा वाचता वाचता अनेकदा ती पात्रं वाचकांच्या कल्पनाविश्वात जिवंत होतात. वाचकांशी बोलू लागतात. कधी कधी भांडू लागतात. कल्पनेतले हेच मित्र कागदावर उतरावे या दृष्टीने ‘बुकगंगा प्रकाशन’तर्फे लहान मुलांसाठी एक आगळंवेगळं पुस्तक दोन महिन्यांत प्रकाशित होत आहे.
या पुस्तकात पंचवीस कथा असणार असून प्रत्येक कथा संपली की त्याच्या शेवटच्या पानावर कोरा कागद असणार आहे. यावर बच्चेकंपनींना कथा वाचून त्यांच्या कल्पनेच्या जगात त्यांनी रंगवलेले विश्व त्यांना कागदावर रेखाटता येणार आहे. या पुस्तकातील कथा संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लिहिल्या आहेत. अशा प्रकारचा मराठीत लहान मुलांसाठी केला जाणारा हा पहिलाच प्रगोग समजला जात आहे.गोष्ट हा प्रकार प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ती गोष्ट ससा-कासवाची असो, बिरबलाची असो, तेनालीरामची असो, इसापची असो, राजा-राणीची असो, परी राज्य असो किंवा अगदी हल्लीचा हॅरी पॉटरची असो. अशा कथा ऐकताना, वाचताना किंवा अगदी सांगताना एका वेगळ्या विश्वाची सफर प्रत्येकजण करत असतो. मात्र अशा कथेतून जो तो आपले स्वंतत्र वेगळे रंग भरून एक अद्भुत जग तयार करत असतो. याच जगाचे चित्र कोऱ्या कागदावर रेखाटता यावे यासाठी हा प्रगोग केला जात असल्याचे सांगण्यात आले. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यात ही पुस्तके मोलाचा वाटा उचलतील, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.
माझ्या लोकप्रिय गाण्यांमधील बहुतांश गाणी ही लहान मुलांची आहेत. पण तरीदेखील मला असे वाटते की जेवढय़ा प्रमाणात काम केले जावे, तेवढे अद्याप तरी केले जात नाही. त्यामुळे आम्ही हा एक प्रयोग करत आहोत. ‘मधली सुट्टी’ ही मालिका करत असताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे अशी की आपण सगळेच मिळून उगाचच लहान मुलांवर काही ‘अटी’ लादत असतो आणि त्यांनाही आपल्यासारखे हिशोबी करून टाकतो. म्हणजे आपल्या कथेतला ‘राजा’ त्यांनी पण तो तसाच बघावा अशी बंधने घालत असतो. त्याचा राजा वेगळा असू शकतो ना. त्यामुळे लहान मुलांसाठी हे नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचे पुस्तक ठरेल. सध्या कथा लिहून झाल्या असून आता त्या मी माझ्या मुलासमोर वाचून दाखवत आहे. ज्या कथा मुलांना आवडतील त्यांचाच समावेश या पुस्तकात केला जाणार आहे.
– सलील कुलकर्णी, संगीतकार

प्रत्येक मोठय़ा माणसात एक लहान मूल दडलेले असते. आणि त्याला सतत असे वाटत असते की त्याला कोणीतरी गोष्ट सांगावी. त्यामुळे हे पुस्तक जेवढं लहान मुलांसाठी आहे तेवढंच मोठय़ांसाठीदेखील आहे. गोष्ट वाचण्यासह मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा असा या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. येत्या दोन महिन्यांत हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे. हे पुस्तक पावणेदोनशे पानी असेल, अशी माहिती बुकगंगाचे सीईओ मंदार जोगळेकर यांनी दिली.

Story img Loader