शवविच्छेदनानंतर गोविंद पानसरे यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने मुंबईहून सकाळी पावणेबाराच्या सुमारास कोल्हापूरला रवाना झाले. मात्र, त्या वेळेस विमानतळावर कराव्या लागणाऱ्या विविध सोपस्कारांकरिता पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला राज्य सरकारतर्फे एकही मंत्री किंवा सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरकारतर्फे कुणीच उपस्थित नसल्याने आदल्या दिवशी सायंकाळपासून पानसरे यांच्यासमवेत असलेले जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनाच सर्व कागदपत्रांच्या फायली सांभाळत विमानतळावरील सर्व सोपस्कारांकरिता धावाधाव करावी लागत होती. इतकेच नव्हे, तर पानसरे यांचे पार्थिव विमानतळावर आणले जाणार आहे, याबाबतच्या पूर्वसूचनाही तेथील पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या नव्हत्या. नाही म्हणायला पानसरे यांना मुंबईतून अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून आमदार कपिल पाटील या ठिकाणी आल्याने डॉ. लहाने यांचे काम काही अंशी सोपे झाले. तसेच, विमानतळावरील काही संवेदनशील अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आत्मीयतेने डॉ. लहाने यांना मदत केल्याने कोणत्याही विलंबाविना पानसरे यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांना कोल्हापूर येथे नेता आले. मात्र, सरकारतर्फे कुणीच मंत्री किंवा अधिकारी या ठिकाणी हजर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पानसरे यांना उपचारांकरिता शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईत आणल्यानंतर डॉ. लहाने सातत्याने त्यांच्यासमवेत होते. पानसरे यांच्या निधनानंतरही डॉ. लहाने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात थांबले होते. रात्रभर ते झोपलेही नव्हते. सकाळी आठच्या सुमारास पानसरे यांचे पार्थिव शवविच्छेदनाकरिता जेजेमध्ये आणण्यात आले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात येऊन पानसरे यांचे अखेरचे दर्शन घेतले. शवविच्छेदन संपेपर्यंत म्हणजे सुमारे दोन तास शरद पवार डॉ. लहाने यांच्याशी चर्चा करत रुग्णालयात थांबले होते. शवविच्छेदन पार पडल्यानंतर डॉ. लहाने पानसरे यांची मुलगी, मुलगा, सून आदी नातेवाइकांसोबत अ‍ॅम्बुलन्सने विमानतळावर आले. तोपर्यंत कपिल पाटीलदेखील तेथे आले होते. विमातळावरील तांत्रिक सोपस्कार पार पाडताना या दोघांची एका टर्मिनलहून दुसऱ्या टर्मिनलवर अशी दमछाकही झाली. ‘अर्थात या त्रासाबद्दल आमची तक्रार नाही. परंतु, सरकारच्या वतीने कुणी असते तर पानसरे यांच्या कुटुंबीयांना तितकाच दिलासा मिळाला असता,’ अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

Story img Loader