दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह असून ठिकठिकाणच्या गोविंदा पथकांनी रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव केला आहे. परंतु मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथकाने उंच मानवी मनोरे रचण्याच्या स्पर्धेत न उतरता सामाजिक संदेशाचे थर रचण्याचा निर्णय घेतला आहे. हे गोविंदा पथक गोपाळकाल्याच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईतील विविध ठिकाणच्या दहीहंडी उत्सवांमध्ये तीन थर रचून चौथ्या थरावर महिलांच्या सबलीकरणावर आधारित देखाव्याचे सादरीकरण करणार आहे. ‘महिला सबलीकरणा’च्या देखाव्याची संकल्पना शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक बोभाटे यांची असून संहिता प्रथमेश पवार यांनी लिहिली आहे. संहितेचे वाचन प्रतीक बोभाटे आणि पथकातील सदस्यांनी केले आहे.  तर अध्यक्ष किशोर कदम, खजिनदार संदीप कोळप आणि सचिव संदेश दळवी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या देखाव्यात चौथ्या थरावर छत्रपती शिवाजी महाराज, एक मुलगी आणि राक्षसरूपी दुर्गुणी मुलगा असणार आहे. सादरीकरणादरम्यान संहितेसह गाणीही वाजणार आहेत. त्याचबरोबर दोन मुलींनी धाडसी स्त्रियांची भूमिकाही साकारलेली आहे. त्यामुळे हा अनोखा देखावा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. शिवसागर गोविंदा पथकामध्ये एकूण १५० गोविंदांचा समावेश असून दररोज ते ३ ते ४ तास सराव गोविंदांनी केला आहे.  शिवसागर गोविंदा पथकाने आतापर्यंत मानवी मनोरे रचून ‘झाडे लावा – झाडे जगवा’, ‘सर्वधर्म समभाव’, ‘पाणी वाचवा’ आदी संदेश दिले आहेत. तसेच शिवकालीन प्रसंगाचेही सादरीकरण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात ३०० यशस्वी प्रत्यारोपण

गतवर्षी शिवसागर गोविंदा पथकाने दादरमधील आयडियल गल्लीतील दहीहंडी उत्सवात तीन थरांचा मानवी मनोरा रचून चौथ्या थरावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा केलेला वध’ या शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. मानवी मनोऱ्यावरील अफझलखान वधाची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली होती. यंदाही सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून महिलांना सबलीकरणाचे धडे देण्यासाठी हे पथक सज्ज झाले आहे.  

‘गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले असून लहान मुलींवरही बलात्कार होत आहेत. परंतु याबाबत सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे महिलांनी स्वतः सक्षम होऊन सदर परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंदा महिला सबलीकरणाचा देखावा तीन थर रचून चौथ्या थरावर साकारणार आहोत. या अनोख्या देखाव्यातून महिलांना सबलीकरणाचे धडे मिळतील आणि सरकारचे लक्ष वेधून नराधमांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले जातील’, असे प्रतीक बोभाटे यांनी सांगितले.

उमरखाडीमध्ये पौराणिक चित्ररथांची मिरवणूक

आपली परंपरा व संस्कृती जोपासण्यासाठी अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळ  दहीहंडी उत्सवात पौराणिक चित्ररथ साकारणार आहे. त्यामध्ये आकर्षक वेशभूषा केलेली मुले – मुली सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर बँड पथक, बँजो पथक आणि ढोल – ताशांच्या तालावर उमरखाडीचे गोविंदा आपले पारंपरिक कौशल्य दाखविणार आहेत. पौराणिक चित्ररथांची मिरवणूक दक्षिण मुंबईतील डोंगरी, कुंभारवाडा, गिरगांव, ठाकूरद्वार, मुंबादेवी, चिंचबंदर या विभागातून जाणार आहे. ही मिरवणूक गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उमरखाडीतील गणेश चौकातून निघणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concept of womens empowerment by shivsagar govinda pathak mumbai print news zws