प्रति युनिट अडीच रुपयांची सवलत; १ जानेवारीपासून अंमलबजावणी
राज्यातील उद्योगांना रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत वीजवापरासाठी असलेली १ रुपयाची सवलत वाढवून ती अडीच रुपये प्रति युनिट करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने परवानगी दिली आहे. १ जानेवारीपासून मार्चपर्यंत तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर ही सवलत देण्यात आली आहे.
राज्यातील उद्योगांचे वीजदर जास्त असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी रात्रीच्या वीजवापरासाठी प्रतियुनिट अडीच रुपये सवलत द्यावी असा प्रस्ताव ‘महावितरण’ने वार्षिक वीजदरवाढ याचिकेवेळी दिला होता. पण वीज आयोगाने ८५ पैसे प्रतियुनिटची सवलत केवळ १५ पैशांनी वाढवत १ रुपया केली. त्यानंतर राज्यभर उद्योगांनी आंदोलन केले. ‘महावितरण’नेही पाठपुरावा करीत फेरविचार याचिकेत या मुद्दय़ाचा समावेश केला. राज्य वीजग्राहक संघटना, ठाणे-बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन या संघटनांनी वीज आयोगापुढे त्याचे समर्थन केले.
रात्रीच्या वेळी राज्याकडे सुमारे ३०० ते ५०० मेगावॉट वीज शिल्लक राहत आहे. ती सवलतीच्या दरात मिळाल्याने उद्योगांना दिलासा मिळेल. तसेच काही प्रमाणात दिवसाची वीजमागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. १ जानेवारीपासून मार्च अखेपर्यंत प्रयोगिक तत्त्वावर ही सवलत देण्यात येईल. उद्योगांचा रात्रीचा वीजवापर वाढतो काय? आणि महसुलावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.