साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी करून नववर्षांचे स्वागत करण्याचा पायंडा आहे. या मुहुर्तावर गृहनोंदणी वा वाहनखरेदी करून स्वप्नांची पूर्ती करण्याकडे सामान्यांचा कल असतो. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट, देशांतर्गत वाढती महागाई व दुष्काळाची पडछाया यांमुळे यंदा हे चित्र काहीसे नकारात्मक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत भारतीय बाजारपेठेतील वाहन विक्री गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच घटल्याचे दिसून आले. तर वाढत्या किमती व कर्जाचे चढे व्याजदर यांमुळे गृहखरेदीकडेही ग्राहक पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, वाहन कंपन्या आणि बांधकाम उद्योजक ग्राहकांवर विविध सवलतींचा वर्षांव करत असतानाही विक्रीची गुढी अद्याप उतरतीच असल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार विक्रीचा टक्का १२ वर्षांत प्रथमच घसरला
इंधनाच्या वाढत्या किमती आणि एकंदरच महागाईच्या वातावरणामुळे वाहनखरेदीकडे ग्राहकांचा ओढा आटल्याचे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांतील आकडेवारीतून दिसून आले आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत १८ लाख ९५ हजार कारची विक्री झाली, जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल ६.७ टक्क्यांनी घसरली आहे. २००१ नंतर वाहन विक्रीचा टक्का पहिल्यांदाच घसरलेला दिसला आहे. विशेष म्हणजे, कारपेक्षा या नव्या बडय़ा आकाराच्या पण अधिक इंधन खाणाऱ्या प्रवासी वाहनाकडे ग्राहकांचा पसंती कल स्पष्टपणे झुकलेला दिसून येतो. मात्र, या गाडय़ाांच्या किमती जास्त असल्याने त्यांचा बहुतांश ग्राहक वर्ग हा श्रीमंत वा उच्च मध्यमवर्गीय गटातीलच असल्याचे आढळून येते.

सवलतींचा ‘कार’नामा
तुम्हीच तुमच्या कर्जाचा हप्ता ठरवा, आमच्याकडून मिळवा तीन वर्षांचा विमा मोफत.. २५ हजार रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस.. नव्या गाडीच्या बुकिंगवर पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत.. अमूक एवढी रक्कम भरा नि पुढील रक्कम सावकाश बिनव्याजी भरा.. अशा भारंभार सवलतींचा वर्षांव करत अनेक कार कंपन्यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना शोरूमकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आर्थिक मंदीने वाहननिर्मिती क्षेत्राच्या चाकातली हवाच काढून घेतली आहे. त्यामुळेच कारची खरेदी वाढावी, यासाठी कंपन्या सवलतींचा वर्षांव करत आहेत.

कुणी घर घेता का घर?
मुंबई शहर व उपनगराच्या बरोबरीने लगतच्या मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सरकार लक्ष देत असल्याने ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार पट्टय़ात गृहप्रकल्पांचा आरंभ आजच्या मुहूर्तावर करण्यात येत आहे. ग्राहकांनी हा मुहूर्त साधावा, यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्याबरोबरच आकर्षक बक्षीसांची घोषणा बिल्डरांनी केली आहे. विविध बँका गृहकर्ज स्वस्त आणि चटकन देण्याबाबतच्या जाहिराती करत असल्याने गुंतवणूकदारही घरांच्या खरेदीत रस घेतील, अशी बिल्डरांना आशा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concessional sugar no sale