पाण्यानंतर अखंड सृष्टीला व्यापून उरणारे काही असेल तर तो म्हणजे कचरा. कचऱ्याकडे पाहून किळसवाणे वाटत असले तरी कचरा हा भौतिक प्रगतीचा मापदंड मानावा एवढा त्यांचा परस्परसंबंध दिसतो. जेवढी भौतिक श्रीमंती जास्त तेवढा कचरा अधिक. श्रीमंती हवी असली तरी कचरा हा नकोसाच असतो. नको असलेले सामान कचऱ्यात जात असले तरी नको असलेल्या कचऱ्याचे काय करावे हा भौतिक प्रगतीच्या शोधात निघालेल्या जगासमोर उभा ठाकलेला प्रश्न आहे. त्यातच जैवविविधतेशी टक्कर देण्याइतपत कचऱ्यातील वैविध्य वाढत आहे. ओला कचरा-सुका कचरा हे दोन प्रकार अगदीच सामान्य वाटायला लागावे असे वैद्यकीय कचरा, नकोशा झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, उद्योगातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ, रासायने, डेब्रिज, तेलविहिरीतून बाहेर पडणारा गाळ, अणूभट्टीतून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग, आकाशात फिरत असलेले कृत्रिम उपग्रहांचे तुकडे असे सतराशे साठ प्रकार अस्तित्वात आले आहेत.
कचऱ्याच्या या अक्राळविक्राळ समस्येच्या आणि त्याच्या विघटनाच्या पद्धतींवर चर्चा होणार आहे ती लोकसत्ता ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत होत असलेल्या ‘आपण आणि पर्यावरण’ दोन दिवसीय परिषदेत. लोकसत्ताने टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या सहकार्याने ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या या परिषदेला रिजन्सी ग्रुप आणि केसरीचीही मदत मिळाली आहे.
पर्यावरणीय असंतुलनाचे मानव, पशू-पशी- झाडे यावर होत असलेले परिणाम आणि पर्यावरणामागचे अर्थकारणही या परिसंवादात उलगडून दाखवले जाईल. जंगल आणि पाणी या पर्यावरणाच्या अविभाज्य घटकांवरील चर्चेमधून माणसांच्या आजूबाजूला असलेली सृष्टी, अद्भुताहून अद्भुत असलेले वास्तव आणि सद्य:स्थिती यावरही प्रकाश टाकला जाईल.
कचऱ्याची समस्या जेवढी गंभीर तेवढीच शहरातील पर्यावरणाचीही. हवा, पाणी, ध्वनी एवढेच काय पण जमीन आणि सागरही प्रदूषणावाचून दूर राहिलेला नाही. हिरवाईच्या उरलेल्या पुंजक्यात शुद्ध हवा मिळवण्याची धडपड करणाऱ्या शहरातील रहिवाशांना या समस्येचा खरा आवाकाच समजला नसावा अशी भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. पाणी, रस्ते अशा मूलभूत सोयी देण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकांची यंत्रणा सांडपाणी आणि कचऱ्याचे नियोजन करताना पूर्ण ढेपाळते. ‘शहर आणि पर्यावरण’ या विषयात महानगरातील समस्यांचा लेखाजोखा मांडण्यासोबतच त्यावरील उपायांवर अधिक भर दिला जाईल.