इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : मुंबईतील शहर भागातील रस्त्यांची नवीन कामे वादात सापडल्यामुळे रखडलेली असली तरी एका बाजूला २०२१-२२ या आर्थिक वर्षांत दिलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे शहर भागात सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शिवसेनेची सत्ता महापालिकेत असताना दिलेल्या २२०० कोटींच्या कामांपैकी शहर भागातील ही कामे सुरू झाली आहेत. सहा हजार कोटींच्या नव्या निविदेतील कामेही पश्चिम आणि पूर्व उपनगरात काही ठिकाणी सुरू झाली आहेत.
दरवर्षी पावसाळयात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडत असल्यामुळे महापालिकेने रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत दरवर्षी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात होते. मुंबई एकूण सुमारे २००० किमीचे रस्ते असून त्यापैकी पन्नास टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षांत पालिकेने २३६ किमीची २२०० कोटींची कामे हाती घेतली होती.
हेही वाचा >>> मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोस्टल रोडबाबत मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, म्हणाले जानेवारी महिन्यात…
पालिकेची मुदत संपण्याआधी या कामांना मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांची ही कामे ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली होती. मात्र, मे २०२३ मध्ये पावसाळय़ात ही कामे थांबवण्यात आली होती. त्यातच राज्यात गेल्या वर्षी सत्तापालट झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा एकदा ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या कामांसाठी ६,०७८ कोटींच्या म्हणजेच प्रथमच मोठया प्रमाणावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र हे वर्ष संपत आले तरी ही कामे सुरूच न झाल्यामुळे मोठा वाद झाला होता. शहर भागात तर एकाही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे शहर भागातील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली. तसेच त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले. त्यामुळे नव्या निविदेतील शहर भागातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. आता एका बाजूला आधीच्या निविदेतील कामे आता सुरू झाली आहेत. रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
शिवडीतील टी. जे. रोड येथील रस्त्याचे काम नवीन कंत्राटात समाविष्ट होते. त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. परंतु, त्याच्या आजूबाजूची आधीच्या कंत्राटातील कामे आता सुरू झाली आहेत, अशी माहिती शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
‘कंत्राटदारांना उद्दिष्ट’
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नवीन कंत्राटदारांना दिलेली कामेदेखील काही ठिकाणी सुरू झाली असून या कामांना वेग येण्यासाठी कंत्राटदारांना तिमाही उद्दिष्टे ठरवून देण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. शहर भागासाठी नव्याने कंत्राटदार नेमल्यानंतरच ही कामे सुरू होतील, असेही ते म्हणाले.
शहर भागातील कामे ..
गिरगावातील बाबासाहेब जयकर मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, मलबार हिल येथील नारायण दाभोळकर मार्ग, शिवडी येथील श्रवण यशवंत पर्वते चौक, नाकवाची वाडी, टी जे कॉस रोड, वडाळामध्ये प्रबोधनकार ठाकरे मार्ग येथील ही सिमेंट काँक्रीटची कामे सुरू झाली आहेत.