मुंबई : माजी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने डांबरी आणि पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून आतापर्यंत सुमारे १३३३ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यांतील ७५ टक्के, तर दुसऱया टप्प्यांतील ५० टक्के काँक्रिटीकरणाची कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईमधील तब्बल २,०५० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीची कामे मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होतात आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत १,३३३ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण केले आहे. त्यात उपनगरातील आरे रोड, अंधेरी – कुर्ला लिंक रोड, नारायण दाभोळकर मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, शहीद भगतसिंग मार्गापासून नेव्ही नगरला जोडणारा नानाभाई मुस मार्ग आणि शहर परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ६९८ रस्त्यांची (३२४ कि.मी.) कामे जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आली आहेत. यापैकी १८७ ररस्त्याची कामे (सुमारे २६ टक्के) पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यात १४२० रस्त्यांचे (३७७ कि.मी.) काँक्रिटीकरण प्रस्तावित असून यापैकी ७२० रस्त्यांची कामे डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. टप्पा १ मधील ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
सागरी किनारा मार्ग
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे (कोस्टल रोड) ९४.५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वांद्रे वरळी सागरी सेतू ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापर्यंतची दक्षिण मार्गिका आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (मरीन ड्राईव्ह) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची उत्तर मार्गिका २७ जानेवारी २०२५ पासून वाहतुकीस खुली करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून प्रवासाचा कालावधी, इंधनाचा खर्च व प्रदूषण यात घट झाल्याचा दावा महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात केला आहे.