मुंबई : वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन या रस्त्याच्या नियोजित काँक्रिटीकरणाच्या कामाला महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. रस्ता सुस्थितीत असून त्यावर फारशी रहदारी नसल्याने या रस्त्याचे काँक्रीटीकरण करू नये, अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, संबंधित रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्याआधारे योग्य निष्कर्ष काढून कामाबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश गगराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन भागातील रहिवाशांनी भूषण गगराणी यांना एक निवेदन दिले आहे. ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन ही सध्या सुस्थितीत आहे. हा रस्ता लहान, अरुंद व टोकाकडचा भाग आहे, त्यामुळे तिथे फारशी रहदारी नसते. तसेच, या रस्त्याला लागून पूर्ण वाढ झालेले वृक्ष आहेत. काँक्रिटीकरण सुरु असताना त्यांना हानी पोहोचू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्याच्या अखेरीस मुलींची प्राथमिक शाळा असून रस्ते काम सुरू झाल्यानंतर त्यांना ये-जा करण्यास अडचणी उद््भवू शकतात. तसेच, या ठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये वास्तव्याला असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या तुलनेने अधिक असल्याने त्यांना धुळीचा त्रास होवू शकतो. याच रस्त्यावरील एका इमारतीचा पुनर्विकास लवकरच सुरू होणार असून पर्यायाने स्थानिक रहिवाशांच्या अडचणी वाढतील. एवढेच नव्हे तर आगीसारख्या घटना अथवा वैद्यकीय अणीबाणीच्या प्रसंगात विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते, आदी बाबी रहिवाशांनी निवेदनात नमूद केल्या आहेत. या निवेदनाची दखल घेवून गगराणी यांनी ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन या रस्त्याच्या नियोजित काँक्रिटीकरण कामास तूर्त स्थगिती दिली आहे. तसेच, संबंधित रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्याआधारे योग्य निष्कर्ष काढून निर्णय घ्यावा, असे आदेश रस्ते विभागाला दिले आहेत.

आतापर्यंत १, ३३३ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण

महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट विहित मुदतीत गाठण्यासाठी मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग दिला आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ३३३ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण महापालिकेने पूर्ण केले आहे. यात उपनगरांमधील आरे मार्ग, अंधेरी कुर्ला जोड रस्ता आणि नारायण दाभोळकर मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, शहिद भगतसिंग मार्गापासून नेव्ही नगरला जोडणारा नानाभाई मुस मार्ग आणि शहर परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे.