मुंबई : शहरातील प्रत्येक विभागात काँक्रीटीकरणाच्या कामासाठी खोदलेला एक तरी रस्ता सध्या वाट्याला येत आहे. संपूर्ण मुंबईतील तब्बल ३५ टक्के रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांना जाच सहन करावा लागत आहे. या विषयाची थेट विधीमंडळात चर्चा झाली असली तरी पुढील किमान दोन महिने तरी या जाचातून सुटका होणार नसल्याचे स्पष्ट आहे.
महापालिकेने गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे महाप्रकल्प हाती घेतले. टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण होणे अपेक्षित असताना गेल्या दोन वर्षात महापालिकेने तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या. ही कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने एकाचवेळी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांचे कार्यादेश देण्यात आले. परिणामी मुंबईतील सुमारे दोन हजार किमी लांबीच्या रस्त्यांपैकी जवळजवळ ३५ टक्के रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र विकासाची ही ‘महाघाई’ मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरते आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिम, वांद्रे पूर्व या परिसरात रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडली आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. ज्येष्ठ नागरिक गर्दीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळत आहेत. चारचाकी वाहने इमारतीबाहेर (पान ४ वर) (पान १ वरून) काढणेही अवघड होऊन बसले आहे.
उपयोगिता वाहिन्या फुटल्यामुळे दूषित पाणी पुरवठा, सांडपाणी रस्त्यावर येणे, दूरसंचारसेवा बंद होणे अशा असंख्य त्रासाला सामोरे जावे लागते आहे. नव्याने कोणतेही खोदकाम करू नये असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. मात्र बोरिवली पश्चिमेकडील देवकीनगर परिसरात कल्पना चावला मार्ग नव्याने खोदला गेल्याचा आरोप कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी समाजमाध्यमांवरून केला आहे.
मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते महापालिकेच्या आखत्यारीत येतात. त्यापैकी गेल्या काही वर्षांत १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्यांचे काँक्रिटिकरण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची कामे दोन टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यापैकी काही कामे सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.
एक रस्ता कितीदा खोदणार?
अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांचा दर्जा चांगला नसल्यामुळे कंत्राटदारांकडून पुन्हा काम करवून घेतले जात आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना एकाच त्रासाला पुन्हा-पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अंधेरी आणि गिरगावातही एकच रस्ता पुन्हा खोदल्याचे प्रकार घडले आहेत. चेंबूरच्या यशवंतनगर परिसरात ऑक्टोबरपासून रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र मलनि:सारण वाहिनी टाकणे बाकी असल्यामुळे कॉंक्रीटीकरण सुरू झालेले नाही. या कामाला अजून तब्बल एक वर्ष लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता अखेर रस्ते विभागाने कामे करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे.