महाराष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीसाठी सद्यस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’तर्फे ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण हा प्रगतीचा पहिला टप्पा असल्याने या उपक्रमाचा श्रीगणेशा शुक्रवारी २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘शिक्षणात महाराष्ट्र कुठे?’ या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राने होत आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते होईल. तर पुण्याच्या ‘सिम्बॉयसिस’ शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या बीजभाषणाने चर्चासत्राची सुरुवात होईल. पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाने होणार आहे. दुसऱ्या दिवशी या चर्चासत्राचा समारोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणाने होणार आहे.
महाराष्ट्रात एकीकडे शिक्षण संस्थांचे पीक येत आहे, नियम धाब्यावर बसवून खासगी शिक्षणसम्राट मनमानी करू लागले आहेत. अशा विचित्र स्थितीमुळे राज्यातील शिक्षणाच्या दर्जाबाबतचे चित्र मात्र फारसे आशादायक नाही. विद्यार्थी आणि पालकांनाही भेडसावणारी, केजीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची अवस्था आणि त्यात आवश्यक असलेले बदल यांचा धांडोळा ‘शिक्षणात महाराष्ट्र कुठे?’ या विषयावरील या चर्चासत्रात घेण्यात येईल. या चर्चासत्रातील मंथनातून शिक्षण क्षेत्राच्या विकासाच्या नव्या दिशा समोर येतील. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असणार आहे.
सध्या बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या टप्प्यावर अनेक महत्त्वाचे बदल होऊ घातले आहेत. या विविध टप्प्यांवर महाराष्ट्राला भेडसावणारे नेमके प्रश्न कोणते, त्यासाठी राज्य शिक्षण मंडळे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आदींची काय तयारी आहे, याचा आढावा या उपक्रमाच्या निमित्ताने घेण्यात येणार आहे. याच उपक्रमाशी बरोबरीने एक लहानशी पाहणी ‘लोकसत्ता ऑनलाइन’मार्फत घेण्यात येत आहे. या पाहणीत सहभागी होऊन आपली मते आज पाच वाजेपर्यंत आमच्यापर्यंत कळवा. शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत आमच्या वाचकांची मते जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. मते नोंदविण्यासाठी indianexpress-loksatta.go-vip.net येथे क्लिक करा.
‘बदलता महाराष्ट्र’चा ‘श्रीगणेशा’ शिक्षणाने!
महाराष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीसाठी सद्यस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’तर्फे ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
First published on: 01-08-2013 at 04:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conference in mumbai on various educational issues organise by loksatta