औषधी वनस्पतीचे संरक्षण आणि दीर्घकालीन जतन या विषयावर विज्ञान संस्थेतर्फे १४ आणि १५ डिसेंबरला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जगभरातील ८० टक्के ग्रामीण जनता औषधी वनस्पतींपासून बनविल्या जाणाऱ्या पारंपरिक औषधांवर अवलंबून आहे. तसेच, डॉक्टरांकडून नेमून दिलेल्या औषधांपैकी सुमारे २५ टक्के औषधांमध्ये वनस्पतींचा वापर केला जातो. त्यामुळे दुर्मिळ व आवश्यक औषधी वनस्पतींचे जतन होणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात योग्य जतन आणि संरक्षणाअभावी या वनस्पतींचे पृथ्वीतलावरील अस्तित्त्व संपुष्टात येत आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने झाडांमधील ऊती संवर्धनामार्फत वनस्पतीचे प्रजनन, ट्रान्सजनिक झाडांची वाढ आणि त्यांचे जैविक संरक्षण, शरीरबाह्य़ दुय्यम चयापचय क्रिया, जैविक किटकनाशके आणि बायो खतांचे उत्पादन आणि वापर, किडप्रतिबंधकांची विविधता आदी विषय या परिषदेत हाताळण्यात येणार आहेत.
संस्थेच्या वनस्पतीशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागातर्फे आयोजिण्यात आलेल्या या परिषदेत जैवतंत्रज्ञानाच्या आधारे औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जतन कसे करता येईल, या अनुषंगाने चर्चा होईल.
परिषदेचे उद्घाटन १४ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या आवारात होईल. या परिषदेसाठी केंद्रीय पर्यावरण व वने विभागाचे सहकार्य लाभले आहे.
‘राष्ट्रीय मुल्यांकन व गुणवत्ता परिषदे’चे संचालक प्रा. ए. एच. रंगनाथ यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होईल. या परिषदेत देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील शास्त्रज्ञ, विषयतज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी सहभागी होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा