महाराष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीकरिता सद्यस्थितीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’तर्फे आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचा श्रीगणेशा शुक्रवारी, २ ऑगस्ट रोजी ‘शिक्षणात महाराष्ट्र कुठे?’ या विषयावरील चर्चासत्राने होत आहे.
फक्त निमंत्रितांच्या उपस्थितीत होणाऱ्या या दोनदिवसीय चर्चासत्राचा प्रारंभ पुणे येथील ख्यातनाम सिम्बायोसिस शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या बीजभाषणाने होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणाने शनिवारी सायंकाळी चर्चासत्राचा समारोप होईल.
शुक्रवार आणि शनिवार (२ व ३ ऑगस्ट) असे दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन ‘सारस्वत बँके’चे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते होईल. त्यानंतर मुजुमदार यांचे बीजभाषण होईल.
चर्चासत्रातील दुसऱ्या सत्रातील ‘मराठीची गळचेपी : किती खरी किती खोटी?’ या विषयावरील चर्चेत ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’चे सचिव अमोल ढमढेरे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, निवृत्त मुख्याध्यापक अ. ल. देशमुख, कर्डलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट हे तज्ज्ञ सहभागी होतील.
तिसऱ्या सत्रात ‘शिक्षणमंडळ काय करतंय?’ या प्रश्नावर ऊहापोह केला जाईल. ‘आर. एल. पोद्दार स्कूल’च्या मुख्याध्यापिका अवनिता बीर, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक हेमचंद्र प्रधान, राज्य शिक्षण मंडळाच्या रेखा पळशीकर आणि ‘महात्मा गांधी विद्यामंदिरा’चे मिलिंद चिंदरकर हे या सत्रात आपले विचार मांडतील.
‘आजची शांतिनिकेतनं कुठे आहेत?’ हा चौथ्या सत्राचा विषय आहे. डहाणूतील ‘ग्राममंगल’चे रमेश पानसे, दापोलीतील ‘अक्षरनंदन’च्या रेणू दांडेकर तसेच चिंचवडमधील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’चे कार्यवाह गिरीश प्रभुणे ही मंडळी आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रयोगांची चर्चा करतील. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाने होणार आहे.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवसाचा आरंभ ‘शिक्षकांचे शिक्षण’ या विषयावरील विचारमंथनाने होईल. ‘प्रथम’च्या संस्थापक-सदस्य उषा राणे, ‘क्वेस्ट’चे संचालक नीलेश निमकर, ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’चे प्रशिक्षक नरेंद्र देशमुख, ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन’च्या माजी संचालिका सुमन करंदीकर या विषयाच्या विविध पैलूंची चर्चा करतील. त्यापुढील सत्रात ‘उच्चशिक्षण – कालसुसंगत की कालबाह्य़?’ या विषयावर चर्चा होईल. त्यात ‘यूआयसीटी’चे संचालक डॉ. गणेश यादव, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अरुणा पेंडसे, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि ‘प्राज इंडस्ट्रिज लि.’चे कार्यकारी संचालक प्रमोद चौधरी उच्चशिक्षणाच्या सद्यस्थितीची आणि आवश्यक बदलांची चिकित्सा करतील.