बॉलिवूडमधील बडी धेंडे आणि वाद यांचे नाते पूर्वापार आहे. त्यात शाहरूख खानचा विषय निघाला की, वाद ओघानेच येतात. मध्यंतरी त्याचा आणि सलमानचा वाद गाजला होता. त्यानंतर अगदी गेल्या नोव्हेंबरमध्ये अजय देवगण आणि शाहरूख आमनेसामने आले होते. हा वाद एवढा चिघळला की ‘अजय देवगण फिल्म्स’ने ‘यशराज फिल्म्स’ला न्यायालयात खेचले. निमित्त होते ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांचे! चित्रपटगृहांच्या आरक्षणावरून झालेल्या या वादाची यंदाही पुनरावृत्ती होणार आहे. मात्र या वेळी शाहरूखच्या समोर उभा आहे तो ‘रावडी राठोड’ अक्षय कुमार!
यंदा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा शाहरूखचा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई २’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर असून हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील. गेल्या खेपेला यशराज फिल्म्सने ‘एक था टायगर’च्या यशाचा दाखला देत वितरकांवर दबाव टाकत सगळी चित्रपटगृहे आपल्या पुढील ‘जब तक है जान’साठी आरक्षित केली होती. या वेळी युटीव्ही मूव्हिजचा ‘हिंमतवाला’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या यशाचा फायदा घेऊन युटीव्ही आपल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी चित्रपटगृहे आरक्षित करण्याच्या तयारीत आहेत.
असे झाल्यास बालाजी मोशन्स पिक्चर्सच्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई २’ या चित्रपटासमोर गंभीर समस्या उद्भवणार आहे. बालाजी मोशन्स पिक्चर्सने आतापर्यंत न्यायालयात धाव घेतलेली नाही. मात्र तशी तयारी मात्र सुरू ठेवल्याचे सूत्रांकडून समजते. आता असे झाल्यास शाहरूख आणि अक्षय अप्रत्यक्षपणे आमने सामने येतील.