प्राध्यापकांच्या बहिष्काराला न जुमानता ‘तृतीय वर्ष विज्ञान’च्या (बी.एस्सी.) प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या अट्टहासामुळे सोमवारी अनेक महाविद्यालयांमधील वातावरण तणावाचे झाले होते. आपल्या विविध मागण्यांसाठी ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ या मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संघटनेने ‘एमफुक्टो’ या राज्यस्तरीय संघटनेच्या बरोबरीने विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. गेल्या वर्षी बुक्टूने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकून आंदोलन केले होते. पण या वेळेस परीक्षांवरच बहिष्कार टाकल्याने विद्यापीठाची अवस्था केविलवाणी झाली आहे. मोठय़ा संख्येने शिक्षक या आंदोलनात सहभागी आहेत; परंतु शिक्षकांच्या सहकार्य आणि सहभागाविना परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा अट्टहास कायम असल्याने सोमवारी प्रात्यक्षिक परीक्षांच्या दरम्यान मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बी.एस्सी.च्या रसायनशास्त्र या प्रमुख विषयाच्या विद्यापीठ प्रात्यक्षिक परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. विद्यापीठाच्या अखत्यारीतील तब्बल १३२ परीक्षा केंद्रांवर सुमारे ४,६०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा घेण्यासाठी एका केंद्रावर अंतर्गत आणि बाह्य़ असे प्रत्येकी दोन मिळून चार परीक्षक लागतात. मात्र बहिष्कार आंदोलनामुळे काही ठिकाणी अंतर्गत परीक्षकांनी परीक्षा घेण्यास नकार दिला, तर काही ठिकाणी बाहेरचे परीक्षक आले नाहीत. तरीही काही महाविद्यालयांनी परीक्षा घेण्याचा अट्टहास केल्याने वातावरण तणावाचे बनले.
दादरच्या कीर्ती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बहिष्कारात सहभागी होते. त्यांनी प्रवेशद्वारावरच बाहेरच्या परीक्षकांना आत जाण्यापासून रोखले. तरीही या परीक्षकांनी आत जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण तणावाचे बनले. या गोंधळात सकाळी नऊ वाजल्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही दोन तास विनाकारण ताटकळत महाविद्यालयात थांबावे लागले.
वांद्रय़ाच्या नॅशनल महाविद्यालयात बाह्य़ परीक्षक न आल्याने विद्यापीठाच्या सूचनेनुसार महाविद्यालयातीलच इतर दोन शिक्षकांच्या मदतीने परीक्षा उरकण्यात आल्याची तक्रार आहे. नियमानुसार प्रात्यक्षिक परीक्षांदरम्यान बाह्य़ परीक्षक उपस्थित असावेच लागतात. बाह्य़ परीक्षकांच्या अनुपस्थितीत परीक्षा घेण्याचा हा प्रकार गंभीर असून विद्यापीठ अधिनियमांचे उल्लंघन करणारा आहे, अशी तक्रार ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’चे प्रा. राजेंद्र चौधरी यांनी केली. बुक्टूचे सी. एस. कुलकर्णी आणि सिनेट सदस्य अनुपमा सावंत यांच्यासह चौधरी यांनी या प्रकाराची तक्रार राज्यपालांकडे केली आहे.
सोमवारी एकूण ६५ केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा होणार होत्या. त्यापैकी ४५ केंद्रांवर त्या सुरळीतपणे पार पडल्या. या पुढेही परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांना नंतर संधी दिली जाईल. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही.
दीपक वसावे (परीक्षा नियंत्रक-मुंबई विद्यापीठ)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा