मुंबई / पुणे : पुण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आणि जयंतरावांविषयी संशयाचे वातावरण तयार झाले. मात्र आपण शहा यांची भेट घातलेली नाही आणि शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असा खुलासा करून पाटील यांनीच संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात पाटील यांच्या पक्षांतराबाबत वावडय़ा उठत होत्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते होते. महायुती सरकारमध्ये हे खाते अद्याप कुणाला देण्यात आलेले नाही. जयंत पाटील यांच्यासाठी हे खाते शिल्लक ठेवण्यात आल्याची चर्चा होत होती. प्रत्येक वेळी पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. आता अमित शहा-जयंत पाटील भेटीची जोरदार चर्चा रविवारी समाजमाध्यमांत रंगली. दोन दिवसांत पाटील यांचा शपथविधी होणार अशाही वावडय़ा उठल्या. यावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी आपण शहा यांना भेटलेलो नसल्याचे स्पष्ट केले. अशा बातम्यांमुळे करमणूक होते, असा टोमणाही पाटील यांनी लगावला. जयंत पाटील यांच्याविषयी जाणिवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
अजित पवारांबरोबर सख्य नाहीच
’शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याचे नाटय़ घडले त्याबद्दल अजित पवार गटाने जयंत पाटील यांनाच दोष दिला.
’जयंत पाटील पाच वर्षे प्रदेशाध्यक्षपदी असल्याबद्दल अजितदादांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
’बंडानंतर अजित पवार गटाने प्रथम जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली व पाटील यांना अपात्र ठरविण्याचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे.
’अजित पवार यांनी बंड केले त्या दिवशी सकाळी त्यांनी जयंत पाटील यांना एका मध्यस्थाच्या दूरध्वनीवर संपर्क साधला होता. अजित पवार यांनी थेट आपल्याशी चर्चा का केली नाही, असा प्रश्न तेव्हा जयंत पाटील यांनी मध्यस्थाला केल्याची माहिती आहे.
’बंडाबाबत झालेल्या बैठकांची जयंत पाटील यांना अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती.
शनिवारी दिवसभर शरद पवार यांच्याकडे बैठकांना उपस्थित होतो. पक्षाचे काही नेते मध्यरात्री दीडपर्यंत माझ्या निवासस्थानी होते. त्यात पक्षविस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली. रविवारी सकाळी परत शरद पवार यांच्या निवासस्थानी होतो. शहा यांना भेटण्यासाठी मी पुण्यात गेलो कधी? – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस