मुंबई: राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना पथकरातून सवलत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम होता. पथकर कापला जाऊ नये यासाठी स्वतंत्र मार्गिका राखून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यामुळे पथकर नाक्यांवर बुधवारीही गोंधळ होता. पथकर बंद केल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होण्याऐवजी बुधवारी वाहतूक कोंडीलाच तोंड द्यावे लागले. अनेकांना दुसऱ्या दिवशीही फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश आल्यानेही गोंधळ निर्माण झाला आहे.

मुंबईच्या वेशीवर एकूण पाच पथकर नाके असून या तेथून दररोज लाखो वाहनांची ये-जा सुरू असते. निवडणुक जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी शासनाने आनंद नगर नाका, दहिसर नाका, मुलुंड नाका, वाशी नाका, ऐरोली नाका या पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना पथकर माफ केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर शहरभर या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांचे फलक झळकले. पथकर माफ झाल्यामुळे वाहतूकीचे वेगही वाढेल असे चित्र उभे करण्यात आले. प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर निर्णयानंतर दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम होता. पथकर नाक्यांवर दिवसभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी गर्दीच्यावेळी इतरवेळेपेक्षा अधिक कालावधी नाका ओलांडण्यास लागल्याचे वाहनचालकांनी सांगितले. फक्त हलक्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. अवजड वाहनांकडून पथकर वसून करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र त्या कोणत्या याबाबत वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.

हेही वाचा – ‘आरटीई’ अनुदान मंजुरीसाठी लाच घेणारी लिपिक महिला गजाआड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हेही वाचा – आचारसंहितेचा भंग केल्यास सहपोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

पथकर नाक्याच्या जवळ गेल्यानंतर मोफत प्रवासासाठी दुसऱ्या मार्गिकेतून जाणे आवश्यक असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात येत होते. त्यामुळे मार्गिका बदलण्यासाठी वाहनचालक प्रयत्न करत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. राखून ठेवलेल्या मार्गिकांशिवाय दुसऱ्या मार्गिकेतून वाहन पुढे गेल्यानंतर फास्टॅगमधून पथकराची रक्कम कापल्याचा संदेश वाहनचालकांना मिळत होता. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, फास्ट टॅगचा संदेश येत असला तरी प्रत्यक्षात संबंधितांच्या खात्यातून पथकरापोटी रक्कम वजा होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहनचालकांनी मात्र रक्कम वजा होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहन थांबवून चालकांनी नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जतही घातली. या गोंधळामुळे आणि शहरातील बहुतेक पथकर नाक्यांवर सकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात हलक्या वाहनांचीच संख्या सर्वाधिक होती.