हिवाळी अधिवेशनात वादंग होण्यापूर्वी श्वेतपत्रिका मांडून राष्ट्रवादीने या वादातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपांचे मळभ मात्र दूर होऊ शकलेले नाही. दुसरीकडे काँग्रेसने या वादापासून चार हात दूर राहात, राष्ट्रवादीला शक्यतो दुखवायचेही नाही, अशी भूमिका घेतली असली तरी श्वेतपत्रिकेवर राष्ट्रवादी जेवढी बदनाम होईल तेवढे काँग्रेसला हवेच आहे.
श्वेतपत्रिकेवरून कोण जिंकले, कोण हरले याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात राष्ट्रवादीचा पाठिंबा आवश्यक असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी योग्य वेळ साधली. अधिवेशनापूर्वीच श्वेतपत्रिका मांडण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडले.  पवारांना दुखवू नका, असा संदेशही थेट दिल्लीतून आल्याने काँग्रेस नेते मौन बाळगून आहेत. अधिवेशनाच्या आठवडाभर आधी श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाल्याने त्याची मोठय़ा प्रमाणावर चर्चा होईल व अधिवेशनात राष्ट्रवादीवरील आरोपांची धार कमी होईल हे पवारांचे त्यामागचे गणित आहे.  
अजित पवार यांचा मंत्रिमंडळातील फेरप्रवेश कधी होणार, हा प्रश्नही आहे. अधिवेशनानंतरच त्यांचा प्रवेश होऊ शकतो, असा संकेत राष्ट्रवादीचे नेते देत असले तरी त्यांच्या समर्थक आमदारांना तो लवकरात लवकर हवा आहे. त्यामुळे अधिवेशनात आमदारांचा दबावगटही कार्यरत होईल, अशी चर्चा आहे. त्यात सिंचन घोटाळ्याबाबत न्यायालयात याचिका आहेत. अजितदादांचा फेरप्रवेश झाला आणि न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. त्यामुळे अजितदादांबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीची धडपड सुरू असताना काँग्रेसने मात्र ठोस भूमिका टाळली आहे.
श्वेतपत्रिकेत घोटाळ्याबद्दल काहीच मसाला नसल्याने आरोप-प्रत्यारोप होणार हे निश्चित. विरोधक अधिवेशनात हा मुद्दा तापवण्याची शक्यता आहे. अशा वेळी राष्ट्रवादीची परस्पर बदनामी होणे हे काँग्रेससाठी फायद्याचेच ठरणार आहे.