गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेवर विद्यापीठाच्या नियंत्रणाची गरज
नीलेश अडसूळ
मुंबई : करोनामुळे निर्माण झालेले ऑनलाइन परीक्षांचे सत्र दीड वर्षे उलटल्यानंतरही मुंबई विद्यापीठाच्या अंगवळणी पडलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर सत्र परीक्षांमध्ये अनेक विभागांत परीक्षेचा गोंधळ उडाला होता. विद्यापीठातील सत्र परीक्षांवर परीक्षा विभागाचे नियंत्रण नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे प्राध्यापक संघटनेचे म्हणणे आहे.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा विभागवार घेऊन त्याचे गुण परीक्षा विभागाकडे पाठवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले; परंतु विभागांमध्ये परीक्षांचे गांभीर्य धुडकावले जात असल्याचे निदर्शनास आले. ‘परीक्षांची जबाबदारी विभागप्रमुखांची असतानाही काही ठिकाणी पीएचडी विद्यार्थ्यांवर परीक्षांचा भार टाकण्यात आला. तुम्हीच परीक्षा घ्या, गुणही द्या, अशा सूचना विभागप्रमुखांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. एका विभागाने दोन तासांसाठी खुली केली जाणारी परीक्षेची लिंक तब्बल दोन ते तीन दिवस सुरूच ठेवली, तर काही विभागांमध्ये परीक्षा सुरू असताना विभागप्रमुखच हजर नव्हते,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अॅकॅडमिक स्टाफ असोसिएशनला (उमासा) विचारले असता त्यांनीही विद्यापीठाकडे बोट दाखवले. ‘प्राध्यापकांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने परीक्षांमध्ये अडचणी निर्माण होतात. परीक्षा विभागाचे ऑनलाइन परीक्षांवर नियंत्रण राहील अशी प्रणाली हवी किंवा एखाद्या संस्थेमार्फत परीक्षांचे आयोजन करणे गरजेचे आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पत्रही दिले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले,’ असे ‘उमासा’चे म्हणणे आहे.
झाले काय?
‘विद्यापीठातील अनेक शिक्षकांना आजही तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे कठीण जात आहे. त्यामुळे परीक्षा घेताना शिक्षकांना आणि परिणामी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. विभागवार परीक्षा घ्याव्या, असे विद्यापीठाने सांगितले असले तरी त्याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण प्राध्यापकांना दिलेले नाही. दीडेक वर्षांपूर्वी विद्यापीठाने प्राध्यापकांना मार्गदर्शन केले होते; परंतु त्या वेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले होते. नंतर ते रद्द करून विभागवार परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. परीक्षा कशा घ्याव्यात, काय करावे याचे प्रशिक्षण प्राध्यापकांना दिले नसल्याने विभागप्रमुखांना जमेल त्या पद्धतीने या परीक्षा घेतल्या जात आहेत,’ अशी माहिती प्राध्यापकांनी दिली.
चुकीच्या पद्धतीने परीक्षा झाल्या तर गुणवत्तेवर परिणाम होईल. अशाने निकालामुळे गुण वाढले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना विषयाचे किती आकलन झाले हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या परीक्षा एका छत्राखाली, ठरावीक निकषांवर पारदर्शीपणे व्हाव्यात. त्यासाठी विद्यापीठाने एखादी प्रणाली तयार करून शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे.
– डॉ. बालाजी केंद्रे, सचिव, ‘उमासा’