प्रसाद रावकर
मुंबई : परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या महिलेच्या बाळावर ‘डीएनए’ चाचणीचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. सीमादेवी सुनील कुंभार हिची २० सप्टेंबर २०२३ रोजी प्रसूती झाली. तिला मुलगा झाल्याचे कुंभार कुटुंबीयांना सांगण्यात आले. मात्र, काही वेळाने परिचारिकांनी मुलगी झाल्याची माहिती दिली. त्यामुळे कुंभार कुटुंबीयांनी नवजात बालकास ताब्यात घेण्यास नकार देत भोईवाडा पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने न्यायवैद्यक विभागाकडे ‘डीएनए’ चाचणी प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवापर्यंत ती होईल, असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले. आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु आमच्या हाती मुलगी सोपविण्यात आली, असे सुनील कुंभार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा >>>म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३: प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना सोडत
२० सप्टेंबरपासून माझे कुटुंबीय ‘केईएम’मध्ये आहे. रुग्णालय प्रशासनाने इतका वेळ घेण्याचे कारण काय, हे अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे आम्ही पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे, असे सुनील यांनी सांगितले, तर ‘डीएनए’ चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येईल, अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतल्याचे सुनील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पोलिसांना साकडे
कुंभार दाम्पत्य वडाळय़ात राहते. गर्भवती सीमादेवी यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने १५ सप्टेंबर रोजी केईएम रुग्णालयातील विभाग क्रमांक ४० मध्ये दाखल करण्यात आले. २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शस्त्रक्रियेद्वारे त्यांची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर कक्ष परिचरामार्फत मुलगा झाल्याची बातमी कुंभार यांना देण्यात आली. त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया विभागातून आलेल्या परिचारिकेने मुलगी झाल्याचा निरोप दिला. दोन्ही निरोपांमुळे गोंधळलेल्या सुनील यांनी मुलगा की मुलगी ते आधी सांगा, असा आग्रह धरला. त्यामुळे केईएम प्रशासनाने डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे.पत्नी आणि नवजात बाळाला घरी पाठविण्यात येत नसल्याने अखेर २३ सप्टेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. रुग्णालयाकडून काहीच सांगण्यात येत नाही. त्यामुळे डीएनए चाचणीचा अहवाल मिळावा यासाठी पोलिसांनी मदत करावी, असे साकडे सुनील यांनी घातले आहे.