मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह ध्वनिचित्रफितीचे विधिमंडळात पडसाद पडले. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सोमय्या यांना भाजप पाठीशी घालणार का, असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत केला. यावर सोमय्या यांच्यावरील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफितीची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले.  सोमय्या यांची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यावर त्याची राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या ध्वनिचित्रफितीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरणारे सोमय्या कोणते धंदे करतात हे समोर आले आहे. यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था तात्काळ काढून घेण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच  आठ तासांच्या कालावधीच्या ध्वनिचित्रफितीचा पेनड्राइव्ह दानवे यांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द करीत याची चौकशी करून कारवाईची मागणी केली.  सोमय्या हे मराठीद्रोही   असून राजकीय दलाल आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला. विरोधी पक्षांनी  हा मुद्दा उचलून धरत चौकशीची मागणी केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याची घोषणा  केली.

महिलेवर अत्याचार नाही – सोमय्या

माझ्या संदर्भात काही ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. माझ्याकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात येतो. तथापि, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीची सत्यता तपासावी, अशी मागणी सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

सोमय्या यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : कथित आक्षेपार्ह चित्रफितीप्रकरणी  किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पोलीस तपासणी करीत आहेत. या प्रकरणात सुमारे आठ तासांच्या ३५ चित्रफिती असल्याची चर्चा आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवर एक चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली, अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. तसेच, अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. मात्र माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असे अत्याचार झालेले नाही, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

तक्रार करण्यासाठी पुढे यावे

 विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिलेला पेनड्राइव्ह मी महिला पोलीस अधिकारी आणि महिला डॉक्टरांच्या मदतीने तपासणार आहे. आपली सभागृहातील चर्चा ऐकून या प्रकरणात शोषण झालेल्या महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. यापूर्वी अनेक महिला सभागृहातील चर्चा ऐकून तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आल्या आहेत, या महिलेने देखील पुढे यावे, असे उपसभापती गोऱ्हे यांनी म्हटले  आहे. वृत्तवाहिन्यांनी ध्वनिचित्रफीत प्रसारित करताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over kirit somaiya offensive tape fadnavis announces thorough investigation ysh