मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. तर प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेसाठी किमान एक – दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असताना भाजपला मात्र लोकार्पणाची घाई झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी २४ जुलै रोजी एक ट्विट करत ‘मेट्रो ३’चे लोकार्पण होणार असल्याचे जाहीर केले. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट काढून टाकले. पण त्यांच्या या ट्विटमुळे लोकार्पणावरून चांगलाच गोंधळ झाला आहे. दरम्यान, पहिला टप्पा सुरू होण्यास किमान दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’चे काम सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करून घेत प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास एक ते दीड महिने लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करताच येत नाही. असे असताना बुधवारी विनोद तावडे यांनी २४ जुलै रोजी ‘मेट्रो ३’चे लोकार्पण होणार असे ट्विट केले. या ट्विटनंतर ‘मेट्रो ३’च्या लोकार्पणाच्या बातम्या प्रसिध्द होण्यास सुरुवात झाली आणि लोकार्पणावरून गोंधळ निर्माण झाला.
हेही वाचा…६६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक
अगदी एमएमआरसीही गोंधळून गेले. कोणतीही अधिकृत घोषणा केंद्र, राज्य सरकार वा एमएमआरसीकडून झालेली नसताना, त्यातही सीएमआरएस प्रमाणपत्र नसताना लोकार्पणाचे ट्विट आल्याने गोंधळ निर्माण झाला.‘मेट्रो ३’च्या लोकार्पणाचे ट्विट करणाऱ्या विनोद तावडे यांनी काही वेळाने संबंधित ट्विट काढून टाकले. त्यानंतर मात्र गोंधळ दूर झाला. दरम्यान, लवकरच सीएमआरएस प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर सीएमआरएस प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊन पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी आणखी दीड-दोन महिने लागण्याची शक्यता आहे.