औषध ब्रॅण्डच्या नावातील साधम्र्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याने घाईगडबडीमध्ये चुकीचे औषध दिले जाऊन रुग्णाच्या जीवावर बेतले जाण्याची भीती औषधविक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने मात्र ब्रॅण्डच्या नावावर आपले कोणतेही बंधन नसून केवळ जेनरिक नावावर बंधने ठेवण्याची परवानगी असल्याचे स्पष्ट केले असल्याने औषधांच्या नावांमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॉलीमॅक्स या नावाचे औषध गरोदर महिलेला दिले जाते, तर याच नावाशी मिळतेजुळते ‘फॉलीट्रॅक्स’ हे औषध कर्करुग्णांना दिले जाते. मात्र या दोन्ही औषधांच्या नावामुळे गोंधळ झाल्याने औषधविक्रेते एका औषधाऐवजी दुसरेच औषध देत असल्याच्या घटना आमच्या समक्ष घडलेल्या आहेत. त्यामुळे अशारीतीने केवळ नामसाधम्र्यामुळे नकळतपणे होणारी चूक रुग्णाच्या जीवावर बेतू शकते, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त अर्जुन खडतरे यांनी व्यक्त केले.

पूर्वी औषधांना परवानगी ही त्यांच्या ब्रॅण्ड नावानुसार दिली जात होती. केंद्रीय औषध नियंत्रण विभागाच्या निर्देशानुसार आता औषधांना जेनरिक नावानुसार परवानगी देण्यात येते. त्यामुळे औषधांच्या ब्रॅण्ड नावांची तपासणी करण्याचा अधिकार आम्हाला नाही. ‘मेडझोल’ या एकाच ब्रॅण्ड नावाने अपचन, बुरशीचा संसर्ग आणि जंत या तिन्ही आजारावरील वेगवेगळी औषधे बाजारामध्ये उपलब्ध होती. या औषध  उत्पादकांवर प्रशासनाने कारवाई करून बंदी आणली असली, तरीही मेडझोलप्रमाणे अनेक औषधे बाजारामध्ये उपलब्ध असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पुढे खडतरे यांनी स्पष्ट केले.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यात मेडझोल उत्पादकांवर कारवाई केली असली तरी राज्याबाहेर याच बॅ्रण्डच्या नावाने एकापेक्षा अधिक प्रकारच्या औषधांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे.

होतेय काय?

औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेली ‘स्पार्क’ नावाची गोळी बहुजीवनसत्त्वासाठी (मल्टीविटामिन) दिली जाते. मात्र या एकाच नावाच्या आयुर्वेदिक आणि अ‍ॅलोपॅथी अशा दोन्ही स्वरूपातील गोळ्या उपलब्ध असल्याने ग्राहकांना नेमकी कोणती गोळी हवी, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही, असे डोिबवलीतील एका औषध विक्रेत्याने सांगितले. ‘इव्हाक्युअर’ आणि ‘इव्हाकेअर’ असे नामसाधम्र्य असणाऱ्या औषधांपैकी एक औषध आयुर्वेदिक आहे, तर एक अ‍ॅलोपॅथी. ग्राहक जेव्हा तोडी औषधे मागतो तेव्हा नावाच्या गोंधळामुळे आमच्याकडून चुकीचे औषधे दिले जाते. नेहमीचा ग्राहक असल्यास चुकीचे औषध आल्याचे त्याच्या लगेच लक्षात येते. परंतु असे घडले की आम्हालाही भीती वाटते, असे मुलुंडच्या औषध विक्रेत्याने व्यक्त केले.

यंत्रणाच नाही..

औषधाच्या ब्रॅण्डचे नाव हे त्या औषध उत्पादक कंपनीची बौद्धिक संपत्ती आहे. ती ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत असते आणि ही नावे अनेकदा सारखी असू शकतात. कधी औषधांच्या ब्रॅण्डनावांचे उच्चार सारखे असतात (साऊंड अलाइक औषधे), तर कधी औषधांची ब्रॅण्ड नावे सारखी दिसतात किंवा वेष्टणे सारखी दिसतात (लूक अलाइक औषधे) आणि या लूक अलाइक-साऊंड अलाइक नावांमुळे औषधे देण्यात प्रचंड घोटाळे उद्भवू शकतात, असे मत बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार डॉ. मृदुला बेळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. ट्रेडमार्कद्वारा नोंदणीकृत नसलेलीही अनेक औषधे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. नोंदणीकृत नसल्याने या औषधांवर ना ट्रेडमार्क देणाऱ्या कंपन्यांचे र्निबध आणि बॅ्रण्डचे नाव म्हणून ना अन्न व औषध प्रशासनाचा वचक. त्यामुळे या औषधांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही, असेही पुढे डॉ. बेळे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over similar drug names