नियमांचे उल्लंघन करून एकाच दिवसांत २०६ कोटी रुपयांची कंत्राटे मंजूर केल्यामुळे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे वादाच्या भोवऱयात सापडल्या असताना, यातील ११४ कोटी रुपयांचे कंत्राट कॉंग्रेसच्या जिल्हा पातळीवरील महिला नेत्याच्या संस्थेला देण्यात आल्याचे उघड झाले आहे. अंगणवाडीतील मुलांसाठी चिक्की खरेदीचे कंत्राट सिंधुदुर्गमधील महिला कॉंग्रेसच्या प्रमुख प्रज्ञा परब यांच्या सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेला देण्यात आले. या संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या चिक्क्यांचा दर्जा हलक्या प्रतीचा असल्यामुळे त्यावरूनही टीका करण्यात येते आहे.
२०६ कोटी रुपयांची कंत्राटे देताना नियमांचे पालन न केल्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप कॉंग्रेसने सुरू केला आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. मात्र, याच पक्षाच्या सिंधुदुर्गमधील महिला नेत्याच्या संस्थेने हलक्या दर्जाची चिक्की पुरविल्याचा तक्रार झाल्यामुळे कॉंग्रेस बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. प्रज्ञा परब यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. निर्धारित निकषांनुसार चांगल्या दर्जाची चिक्की पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, चिक्क्यांचा दर्जासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.