तरुणांना कायदा मोडायला लावण्यास उद्युक्त केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्यावर गुरुवारी टीका केली. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे, हेच काम ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत केल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.
रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा केंद्रावर हल्लाबोल करून परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर गुरुवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्ला चढवला. हा हिंसाचार झाला तेव्हा आपण तेथे हजर नव्हतो आणि आपला या हिंसाचारामागे हात नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
तरुणांना भडकावून त्यांना तोडफोड करण्यास प्रवृत्त करायचे आणि नंतर आपला त्यात काही संबंध नाही, असे सांगून खटल्यातून बाहेर पडायचे, हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे पहिल्यापासून धोरण असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यायला लावायचा आणि नंतर त्यांना एकटे सोडून आपण बाहेर पडायचे, हेच या पक्षांच्या नेत्यांचे काम असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले.

Story img Loader