बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोटय़ावधी रूपयांच्या घोटाळ्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पद्धतशीरपणे अडकविण्याची लावलेल्या सापळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते अडकल्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणातून मुंडे सहिसलामत बाहेर पडल्याने राष्ट्रवादीवर मात्र केला तुका, झाला माका असे म्हणण्याची आफत ओढवली आहे.
 बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यानंतर राज्य सरकारने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले असून अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टांकसाळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कारखान्यांसाठी, तसेच आपल्या संस्थांसाठी या बँकेतून कर्ज घेतले मात्र त्याची परतफेड केली नाही. एवढेच नव्हे तर या संस्थाही डुबविल्या. त्यामुळे ६२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेचे टांकसाळे यांनी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित आणि रमेश अडसकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. बीड जिल्ह्यातील राजकारणावरून सध्या भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुंडे यांनी पवार यांच्यावर हल्लाबोल करताना राज्यात युतीची सत्ता येताच राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशी करून अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरूंगाच पाठविण्याचा इशारा दिला होता. मुंडे यांच्या इशाऱ्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी बीड बँक घोटाळ्यात मुंडेंना अडकविण्याचा मास्टर प्लॅन राष्ट्वादीने आखला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड बँकेच्या कारभाराबाबत एक बैठकही झाली. त्यावेळी बँकेच्या कर्ज बुडव्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासकाना देण्यात आले. त्यानुसार प्रशासक टांकसाळे यांनी गुन्हे दाखल केले. मात्र पोलिसी कारवाईचा सुगावा लागताच मुंडे यांनी त्वरित आपली तीन-ते साडेतीन कोटींची थकबाकी भरून टाकली आणि आपली सुटका करून घेतली.

Story img Loader