आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या भूमिकेचे आंबेडकर यांनी स्वागत केले आहे. परंतु गेली दीड वर्षे चर्चा करूनही ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या काँग्रेसला आता युतीची एवढी घाई का झाली आणि दिल्लीतून त्याला मान्यता आहे का, याबाबतचा खुलासा माणिकरावांनी करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. अर्थात महाराष्ट्रात लोकशाही आघाडी मजबूत करण्याचे तसेच राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचे संकेतही त्यांनी दिले.  
गेल्या लोकसभा निवडणुकीत आठवले व गवई गट काँग्रेसबरोबर होता. विधानसभा निवडणुकीत मात्र आठवले यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी फारकत घेतली. गवई गटानेही काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादीशी समझोता केला. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दलित मतांसाठी काँग्रेसबरोबर रिपब्लिकन पक्षाचा एकही गट नाही. त्यामुळेच काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे समझोत्यासाठी हात पुढे केला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही निवडक जिल्हा परिषदा व महापालिकांमध्ये काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाची युती झाली होती. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेसच्या निवडणूक समितीची सोमवारी बैठक झाली. त्यात आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांबरोबर, विशेषत: भारिप- बहुजन महासंघ व पीपल्स रिपब्लिकन पक्षांना बरोबर घेण्याची भूमिका माणिकरावांनी मांडली.