कुलदीप घायवट
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील खार ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम जलदगतीने सुरू आहे. या कामामुळे दररोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द करण्याची घोषणा केली. तसेच इतर गाडय़ा अवेळी धावत आहेत. परिणामी लोकलमधील प्रवाशांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली होती. यातून मार्ग काढण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा वापर मोठय़ा प्रमाणात केला. तसेच खासगी कंपनींनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिल्याने मंगळवारी नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसून आली. दादर, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली या स्थानकांतील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील सहाव्या मार्गिकेचे काम, रेल्वे रूळ जोडणी आणि इतर कामांसाठी ११ दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. त्यात २,५२५ लोकल रद्द करण्याची घोषणा केली होती. त्याचे पडसाद शुक्रवारी, शनिवारी आणि सोमवारी दिसून आले. जीवघेणा प्रवास केल्यानंतर प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>>मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर समाज माध्यांवरील २९ आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
पश्चिम रेल्वेवरील ११ दिवसीय ब्लॉकमुळे दररोज सुमारे २५० लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे नेहमीची लोकल रद्द झाली. तसेच एक लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने येते. तसेच लोकल विलंबाने धावतात. त्यामुळे सध्या कंपनीकडून घरून काम करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, असे एका खासगी जनसंपर्क विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले. पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे सरसकट ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला नाही. पण कोणत्या कर्मचाऱ्याने याबाबत माहिती दिली तर त्याला ब्लॉक संपेपर्यंत घरून काम करण्याची मुभा देण्यात येत आहे, असे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक कुरिअर सेवेतील मनुष्यबळ अधिकाऱ्यांनी (एचआर) यांनी सांगितले.
रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तनात
मंगळवारीही रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक स्थानकात तैनात होते. मात्र मंगळवारी गर्दीचे प्रमाण कमी होते. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केल्याचे दिसून येते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्याने दिली. विरार स्थानकात मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तैनात करण्यात आले होते.
३१६ ऐवजी २०४ लोकल रद्द राहणार
पश्चिम रेल्वेने ३१६ लोकल रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, बुधवार आणि गुरुवारी ११२ लोकल फेऱ्या पूर्ववत करण्यात येणार असून २०४ लोकल फेऱ्या रद्द राहतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.