मुंबई : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ तर विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार या दोन्ही विदर्भातील नेत्यांची निवड करताना मराठा आणि ओबीसी हे जातीचे समीकरण साधण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या पदावरही राज्यात अनोखळी चेहऱ्याला प्रथमच संधी देण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातील असून, त्यांनी एकदा आमदारकी भूषविली आहे. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. या व्यतिरिक्त ते राज्य काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नव्हते. माजी राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील, आबासाहेब खेडेकर, वसंतदादा पाटील, प्रभा राव, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर-पाटील, रामराव आदिक, नासिकराव तिरपुडे, गोविंदराव आदिक, एन. एम. अण्णा कांबळे, प्रतापराव भोसले, माणिकराव ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. सरकार किंवा पक्षात अनेक वर्षे काम केल्यावर त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.सपकाळ हे तुलनेत नवखे आहेत. त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांच्या पथकात १० वर्षांहून अधिक काळ काम केले असले तरी राज्याच्या राजकारणाचा त्यांना फारसा अनुभव नाही. सपकाळ यांची पाटी कोरी असल्यानेच त्यांची निवड करण्यात आली आहे. ईडी किंवा अन्य यंत्रणांचा त्यांना सामना करावा लागणार नाही, असेही पक्षाने बघितले आहे. आक्रमक भूमिका घेण्याचा संदेश पक्षाने त्यांना दिला आहे.
संघटनेत चैतन्य आणण्याचे आव्हान
विधानसभा निवडणुकीत फटका बसल्याने पक्ष संघटनेत चैतन्य आणण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. त्यातच अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्था, सहकारी संस्था अशा कोणत्याही राजकारणात नसलेल्या आणि प्रसंगी सत्ताधाऱ्यांना अंगावर घेऊ शकतील अशा सपकाळ यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विदर्भाला झुकते माप
माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षनेेतेपदी निवड करून ओबीसी समाजाला पक्षाने प्रतिनिधीत्व दिले आहे. पक्षाने आधी नाना पटोले आणि वडेट्टीवार या विदर्भातील दोन्ही नेत्यांकडे अध्यक्षपद आणि विधानसभेतील नेतेपद सोपविले होते. नवीन रचनेत विदर्भाकडेच दोन्ही महत्त्वाची पदे कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीत विदर्भाने काँगेसला साथ दिली होती.