अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा पालिका प्रशासनाने अद्याप स्वीकारलेला नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर भाजपाचे उमेदवार मुजीर पटेल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळतेय. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा>>>> अंधेरी पूर्व पोटनिवडणूक कोण लढवणार? भाजपाच्या उमेदवाराने स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “…तर उमेदवारी अर्ज मागे घेणार”
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच कारणामुळे काँग्रेसमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतून त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे दिले असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा>>>> “उद्धव ठाकरे हताश, अकर्तृत्ववान, अहंकारी”, भाजपा आमदाराचा टोला; म्हणाले, “घरात बसणाऱ्यांना…”
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा नोकरीचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्याप स्वीकारलेला नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांनी नियमानुसार आपला एक महिन्याचा पगार पालिका कोषागारात जमा केलेला असून राजीनाम्याचा रितसर अर्ज केलेला आहे. मात्र पालिकेने अद्याप हा राजीनामा अर्ज स्वीकारलेला नाही. याच कारणामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. उद्धव ठाकरे गटाने लटके यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात ऋतुजा लटके यांनी न्यायालयात धाव घेतली असून माझा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारावा, अशी मागणी त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे.