रेसकोर्समध्ये घोडय़ांवर लावल्या जाणाऱ्या जुगार किंवा बेटिंग संस्कृतीला काँग्रेसचा विरोध असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सध्या सुरू असलेल्या वादाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला.
रेसकोर्सला मुदतवाढ द्यावी का, या प्रश्नावर स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊनच सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. त्याच वेळी या जागेत उद्यान उभारण्याच्या मागणीमागचा डाव काय, असा सवालही उपस्थित केला. या जागेत उद्यान उभारण्याची जनतेची मागणी असल्यास त्याचा विचार झाला पाहिजे. पण ही मागणी स्थानिकांकडून आली पाहिजे. शिवसेनेने मागणी केली म्हणून उद्यान उभारणे चुकीचे ठरेल, असेही ठाकरे म्हणाले.  भाडेपट्टी संपला तरी रेसकोर्सला मुदतवाढ द्यावी, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडल्याच्या पाश्र्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने जुगाराला विरोध करीत काँग्रेस या संस्कृतीचे कधीही समर्थन करणार नाही, असे दाखविण्याचा प्रयत्न केला. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या विजयाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील निकाल कसा असेल याची ही चाहुल असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

Story img Loader