विधान परिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने, महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याची चुणूक दिसली. सत्तेत भागीदार असलेल्या भाजप व शिवसनेनेत उभी फूट पडली, तर विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी राजकीय लढाई झाली. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढताना, कोपरखळ्या मारताना, काही सदस्यांच्या खासगी गाठीभेठींची गुपितेही फोडली गेली. साडेचार तासांच्या वादळी चर्चेनंतर राष्ट्रवादी-भाजपच्या नव्या युतीमुळे अविश्वास प्रस्ताव संमत झाला आणि शिवाजीराव देशमुख यांची अकरा वर्षांची सभापतीपदाची कारकिर्द संपुष्टात आली.
सभापतींनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे त्यांना पदावरुन दूर करावे, या राष्ट्रवादीचे अमरसिंग पंडित यांनी मांडलेल्या दोन वेळीच्या अविश्वास प्रस्तावाने वादाला तोंड फुटले आणि सभागृहातील राजकीय समीकरणेही उलटीपालटी झाली. काँग्रेसबरोबर, शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते व रामदास कदम यांनी, सभापतींकडून काय चुकले, की त्यांच्यविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला, अशी विचारणा करीत, थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यातून भाजप-राष्ट्रवादीचे संबंध काय ते स्पष्ट झाले, या कदम यांच्या उल्लेखाने वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवर चांगलेच खवळले. बाळासाहेब ठाकरे-शरद पवार यांची मैत्री नव्हती का, असा सवाल त्यांनी केला. त्याला कदम यांनी ती मैत्री जगजाहीर होती, छुपी नव्हती, असा पुन्हा टोला हाणला आणि सभागृहात गोंधळ सुरु झाला. सत्तेत असलेल्यांनी भान ठेवून बालावे, असा सल्ला देत गिरीश बापट यांनी कदम यांचा समाचार घेतला.
रायगड जिल्हा म्हणजे शेकापचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याचा पायाच ज्यांनी उखडला, त्या सुनील तटकरे यांच्या छावणीत शेकापचे जयंत पाटील दाखल झाले. यापुढे भाजप-संघाबरोबर जाणार का हे राष्ट्रवादीने जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी संघाच्या उल्लेखाबद्दल आक्षेप घेतला. प्रस्तावाचे समर्थन करताना, सुनील तटकरे यांनी रामदास कदम कुणाच्या बंगल्यावर कशासाठी गेले होते, काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील कुणाच्या गाठीभेटी घेत होते, शिवसेनेचा विरोधी पक्षनेता एक महिन्यात मंत्री कसा झाला, असे चौकार षटकार ठोकत आणि काहींची खासगी गुपिते फोडत काँग्रेस व शिवसेनेला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला.
‘आता चौकशीचे काय?’
कदम यांनी तर, राष्ट्रवादी तिकडे काँग्रेसला फसवत आहे व भाजप इकडे शिवेसनेला फसवत आहे, असा आरोप केला. आता सिंचन घोटाळ्या प्रकरणी सुनील तटकरे यांची चौकशी होणार की नाही, अशी शंका उपस्थित करुन, भाजपवरही नेम धरण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
उखाळ्यापाखाळ्या अन् गुपितांची फोडाफोडी!
विधान परिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने, महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याची चुणूक दिसली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-03-2015 at 02:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress airs differences with ncp over legislative council post