गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी सुनावले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून आता ओरड करता, पण डॉ. बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा काँग्रेसनेच पराभव केला होता. तसेच त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार भाजप सत्तेत भागीदार असलेल्या जनता दल सरकारने दिला होता. घटना समितीवर पश्चिम बंगालमधून निवडून यावे लागले होते, अशा शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मंगळवारी विधानसभेत चांगलेच सुनावले.
चवदार तळ्याचे शिवसेना आमदाराने केलेले शुद्धीकरण, पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातील घोषणाबाजी आणि मंत्रालयासमोरील शेतकऱ्याची आत्महत्या यावरून दुसऱ्या दिवशी विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधी सदस्य हाताला काळ्या पट्टय़ा बांधूनच सभागृहात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. घोषणाबाजी सुरूच होती व कामकाजात वारंवार व्यत्यय आला. ‘जय भीम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावर काँग्रेसचे बाबासाहेबांवरील प्रेम हे नाटक असल्याचा हल्लाच महसूलमंत्री खडसे यांनी चढविला. लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि भंडारा मतदारसंघांतून बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनेच केला होता. घटना समितीवर त्यांना महाराष्ट्रातून नव्हे तर पश्चिम बंगालमधून जावे लागल्याचेही खडसे यांनी सांगितले.
पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातील गोंधळाबद्दल खडसे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दोष दिला. आव्हाड यांना तेथे जाण्याची गरजच काय होती, असा सवाल केला. इशरत जहाँचे गुणगान करणाऱ्यांकडून आणखी कसली अपेक्षा करणार, असा टोमणाही त्यांनी मारला. चवदार तळ्यावरून स्थानिक आमदार गोगावले यांनी खुलासा करूनही विरोधकांकडून वारंवार हा विषय उपस्थित केला जात असल्याबद्दल शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी नापसंती व्यक्त करीत, उपस्थित करण्यासाठी अन्य कोणते विषय शिल्लक नाहीत का, असा सवाल केला.
शासकीय आदेशात जलपूजन हा शब्द नसताना ते कसे काय करण्यात आले, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चवदार तळेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली. जलपूजन करण्यात काहीच वावगे नाही, असे मत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. या गोंधळात शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
ब्राह्मण पुजाऱ्याला बोलाविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा – नीलम गोऱ्हे
मुंबई : महाड येथील चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाच्या वादाचे दुसऱ्या दिवशीही विधान परिषदेत पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची बाजू सावरत, जलपूजनासाठी ब्राह्मण पुजाऱ्याला बोलावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
महाड सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत व ब्राह्मण पुरोहिताकडून झालेल्या कथित जलपूजनाच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. चवदार तळ्याचे शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप आंबेडकरवादी संघटनांनी केला आहे. मात्र, जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित केलेला तो शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होता, असा गोगावले यांचा दावा असला तरी, दुसऱ्या दिवशीही त्याचे पडसाद उमटले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हा मुद्दा उपस्थित करून पुन्हा वादाला तोंड फोडले.