राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट झाले. दोन वर्षांंपूर्वी लोकपालाच्या मुद्दय़ावर अण्णा हजारे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणाऱ्या व त्यांच्यावर यथेच्छ टीकाटिप्पणी करणाऱ्या काँग्रेसने आता याच मुद्दय़ावर अण्णांना साथ देत त्यांची बाजू उचलून धरली. हे सारे दिल्ली निवडणुकीत इंगा दाखविणाऱ्या आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांचा लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोर वाढू नये यासाठीच काँग्रेसने अण्णांना शक्ती देत ‘आप’ची ताकद वाढणार नाही या दृष्टीने पद्धतशीर खेळी केली आहे.
लोकपाल मंजूर व्हावे, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडताच उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी त्यांना पत्र पाठविले. या पत्राला पाठविलेल्या उत्तरात राहुल गांधी यांनी, तुमच्या पत्रामुळे मी प्रभावित झालो असून, लोकपालासाठी सरकार ठाम असल्याचा निर्वाळा दिला.
काँग्रेसने अण्णा हजारे यांची मागणी मान्य करण्याकरिता सारी शक्ती पणाला लावली. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले. हे विधेयक मंजूर व्हावे म्हणून काँग्रेसच्या नेतेमंडळींनी अन्य पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. या विधेयकाला विरोध करणाऱ्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्याशी संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली आणि विधेयक मंजुरीला येईल तेव्हा गोंधळ घालू नये, अशी विनंती केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत हा जोर कायम राहू नये यावर काँग्रेस आणि भाजपचे एकमत आहे. कारण दिल्लीमध्ये या पक्षाने काँग्रेसबरोबरच भाजपच्या मतांवर डल्ला मारला. लोकपाल विधेयक मंजूर करावे या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेले उपोषण, त्याच वेळी अण्णा आणि केजरीवाल समर्थकांमधील मतभेद समोर येताच काँग्रेसने अण्णांची बाजू उचलून धरण्याचा निर्णय घेतला. अण्णा आणि केजरीवाल यांच्यातील दरी आणखी वाढावी या दृष्टीने काँग्रेसने खतपाणी घातले.
अण्णा हजारे यांची मागणी योग्य असल्याचे काँग्रेसचे नेते बोलू लागले. याच मागणीसाठी अण्णांनी ऑगस्ट २०११ मध्ये जतंरमंतरवर उपोषण केले असता याच काँग्रेस नेत्यांनी अण्णांची टिंगळटवाळी केली होती. अण्णांच्या उपोषणाला मिळालेल्या प्रतिसादानंतर मात्र काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले होते. यंदा मात्र अण्णांची मागणी कशी बरोबर आहे हे राहुल गांधी यांनाही विशेष पत्रकार परिषद घेऊन सांगितले. एकूणच अण्णांना मदत करून काँग्रेसने केजरीवाल यांच्यावर कुरघोडी करण्याची खेळी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा