पुण्यातून पत्नी किंवा समर्थकांपैकी एखाद्याला उमेदवारी देण्याच्या राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी यांच्या हट्टाला न जुमानता काँग्रेसने राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी नाकारण्यात आल्याने आता कलमाडी कोणती भूमिका घेतात याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कलमाडी यांना धक्का देण्यात आला असला तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव उमेदवारीसाठी विचाराधीन असल्याचे संकेत आहेत. काँग्रेसतर्फे मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात राज्यातील चार जागांचा समावेश आहे. पुण्यातून विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर झाली तर चंद्रपुरातून सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, पालघरमधून आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, तर लातूरमधून राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील मतदान पद्धतीने निवडून आलेल्या दत्तात्रय बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड, औरंगाबाद आणि यवतमाळ वगळता अन्य २४ उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. पुण्यातून आपल्याच घरातील सदस्याला किंवा समर्थकाला उमेदवारी मिळावी यासाठी सुरेश कलमाडी यांनी जोर लावला होता. मात्र, राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या कलमाडी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिल्यास विरोधकांना आयतेच कोलित मिळेल, अशी भीती पक्षात होती. कलमाडी यांनी कदम यांना मदत करावी म्हणून एका बडय़ा उद्योजकाने पुढाकार घेतल्याचे समजते. पुण्यात मराठा समाजातील नेत्याला उमेदवारी देण्याचा मतप्रवाह होता. दरम्यान, नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात अनुकूल मत आहे.‘आदर्श’ घोटाळ्यात चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट होत नाही, अशी भूमिका सीबीआयने घेतली आहे. भाजपने वादग्रस्त माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना उमेदवारी दिल्याने अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचा फटका बसणार नाही, अशी चर्चा पक्षात झाली. अशोक चव्हाण वा त्यांच्या पत्नी अमिता यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले.