मुंबई : कर्नाटक आणि तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणारे प्रसिद्ध रणनीतीकार सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे. राज्यातील नेत्यांशी कानुगोलू यांनी रणनीतीबाबत नवी दिल्लीत मंगळवारी चर्चा केली. कानुगोलू यांच्या सल्ल्यानुसार आता राज्यात काँग्रेसची रणनीती निश्चित केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील कानुगोलू यांना सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड मागणी आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात कानुगोलू यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या समूहात एकेकाळी काम केलेल्या कानुगोलू यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाच्या धोरण समितीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निवडणूक रणनीतीमध्ये कानुगोलू हे माहीर मानले जातात. काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीयांमध्ये कानुगोलू यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळण्यात सुनील कानुगोलू यांचे निवडणूक नियोजन यशस्वी ठरले होते. कर्नाटकतील तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. ‘४० टक्के कमिशनचे सरकार’ आणि ‘पे सीएम’ या दोन घोषणा लोकप्रिय ठरल्या होत्या. ‘पेटीएमच्या धर्तीवर पे सीएम’ ही कानुगोलू यांची घोषणा आकर्षक ठरली होती. कर्नाटकातील प्रचाराची सारी रणनीती त्यांनी ठरविली होती. गेल्या डिसेंबरमध्ये तेलंगणाच्या प्रचाराची जबाबदारी कानुगोलू यांच्याकडेच होती. मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांच्या प्रचाराचे सारे नियोजन त्यांनीच केले होते.

अजित पवार यांच्याकडूनही सल्लागाराची नेमणूक

आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या यशासाठी रणनीती ठरविण्याकरिता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सल्लागाराची नियुक्ती केली आहे. नवी दिल्लीस्थित नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेची मदत घेण्यात येत आहे. सर्व रणनीती ही कंपनी ठरविणार नाही. पण काही बाबतीत पक्षाला सल्ला देण्याचे काम करेल, असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress appoints sunil kanugolu as strategist in maharashtra print politics news zws