Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation: मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. एकीकडे भाजपाने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हे सुशोभीकरण करण्यात आल्याने उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धक्कादायक! बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीवर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट

मोठी बातमी! दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी एबीपी माझाशी बोलताना याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा भाजपा केली आहे. त्यावर बोलताना भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी याकुब मेमनला फासावर लटकवू नका यासाठी काँग्रेसने सह्यांची मोहीम का राबवली होती. १९९३ स्फोटाप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं असताना फाशी रोखण्याची मागणी का कऱण्यात आली? असा प्रश्न विचारला आहे.

भातखळकर काय म्हणाले?

“याकुब मेमनला फासावर लटकवल्यानंतर जर कुटुंबाने मृतदेह देण्याची मागणी केली असेल तर ती सोपवण्याची पद्धतच आहे. देशद्रोह्यांचं संरक्षण करायचं ही काँग्रेसची निती आहे. ज्या नितीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी बळी पडले. संसदेवर हल्ला केला त्या व्यक्तीला किती वर्ष फासावर लटकवलं नव्हतं. अफजल गुरुला सहा वर्षांनी फासावर लटकवलं होतं तेव्हा कारणं दिली होती,” अशी टीकाही त्यांनी केली.

अतुल लोंढेंचं प्रत्युत्तर –

“काँग्रेसला बदनाम कऱण्याची यांची नेहमीची खेळी आहे. आम्ही अफजल गुरु, कसाबला फाशी दिली आणि जगभरात संदेश दिला. फाशी दिल्यानंतर लोकांना याबद्दल कळलं होतं. गाजावाजा होऊ न देता त्यांना दफन करण्यात आलं होतं. मग यांना याकुबचा मृतदेह देण्याची गरज काय होती? यांचं सरकार आणि गृहमंत्री होते. यांनी दफनविधी होऊ दिला आणि लोक तिथे जमू दिले. आपलं पाप लपवण्यासाठी हे धार्मिक राजकारण करत असून, धर्मांधता पसरवत आहेत. यांच पाप आहे आणि आम्हाला प्रश्न विचारत आहेत. भावनिक राजकारण करायचं, धर्मांधता पसरवायची हा यांचा धंदा आहे,” असा संताप अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

केशव उपाध्येंचीही काँग्रेसला विचारणा

“दाऊदची मालमत्ता खरेदी करणारा मंत्री मंत्रीमंडळात असल्यानंतर, याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण होणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारने देशाच्या हिताशी तडजोड केल्याचं स्पष्ट दिसत आहे. सुशोभीकरण होत असताना महाविकास आघाडी सरकारला कळलं नाही का? यांना लाज वाटली पाहिजे. काँग्रेस निर्लज्ज झाली आहे. देशातील हिंदू, हिंदुत्व, नागरिक यांच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त मतांचं राजकारण करायचं आहे,” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress atul londhe and bjp atul bhatkar keshav upadhye questions each other over yakub memon grave renovation sgy